ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शहरातील नागरिकांसाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅपी स्ट्रीट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते. सकाळी ६ ते ९ या वेळेत वसंत व्हॅली, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे पार पडलेल्या या उपक्रमाचा नगरिकांनी आनंद लुटला. यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांचा उत्साह वाढवला.
‘हॅपी स्ट्रीट’ हा केवळ कार्यक्रम नसून एक चळवळ आहे, ज्यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक आणि आरोग्यदायी उपक्रमांचा लाभ घेतला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी आरोग्यासाठी उपयुक्त तसेच ऊर्जादायक शारीरिक क्रिया योगा आणि झुंबा डान्स, संगीतप्रेमींसाठी वाद्य आणि गाणी यांचे खास सादरीकरण, विविध प्रकारच्या नृत्य शैलींचे सादरीकरण, फेस पेंटिंग आणि अक्षर गणपती पेंटिंग, कलाकारांसाठी कला प्रदर्शनाची संधी, जिम्नॅस्टिक आदी उपक्रम होते.
त्याचप्रमाणे कल्याण शहरातील पर्यावरण मित्र तथा वन्यजीव रक्षक यांनी एकत्र येत साप, अन्य पशु-पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन लावले. तसेच त्यांच्यासाठी दाणा पाण्यासाठी निवडक व्यक्तींना पाण्याचे भांडे विनामूल्य देण्यात आले सर्व लहान मुलां-मुलींसाठीसाठी झुमारींग म्हणजेच दोरीच्या सहाय्याने वर चढून सहभाग घेतला. दत्ता बाँबे, सुहास पवार, नरेंद भिवंडीकर, दिनेश धनगर, कौशल गोळे, निरंत धनके हे निसर्गप्रेमी प्रदर्शनात सहभागी होत सर्व कल्याणकर नागरिकांनी मार्गदर्शन केलं.
या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्यदायी सकाळी मोकळ्या वातावरणात वेळ घालवण्याची संधी मिळाली. सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक थांबवून, नागरिकांसाठी हा मुक्त आनंदोत्सव आयोजित करण्यात आला होता. तर रस्ते आणि स्ट्रीट यातील फरक यानिमित्ताने दिसून येत असून शहरातील अशा आणखी काही रस्त्यांना देखील हॅप्पी स्ट्रीटमध्ये परिवर्तीत करण्याचा मानस असल्याचे केडीएमसी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
दरम्यान हे आनंदी वातावरण पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी अनेक संस्था, संघटना पाठपुरावा करत होत्या. यामुळेच पुन्हा एकदा हा आनंद कल्याणकरांना उपलब्ध करून देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments