ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने कल्याण बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करण्याची मुदत आहे. निवडणुकीसाठी व्यापारी, अडते, ग्रामपंचायत, सेवा संस्थांचे प्रतिनिधी मतदार असणार आहेत. या सर्वांचे मतदार यादीकडे लक्ष लागले असून निवडणूक गाजण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
कल्याण बाजार समितीची निवडणूक १७ मार्च २०१९ रोजी झाली. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ मार्च २०२४ मध्येच संपला. मात्र शासनाने मुदतवाढ दिल्याने एक वर्ष निवडणूक लांबणीवर पडली. मात्र आता राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार १७ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक यांना सादर करावी लागणार आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पणन संचालक विकास रसाळ यांनी कल्याण बाजार समितीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांची नियुक्ती केली होती. मात्र आठच दिवसात प्रशासकीय राजवट उठवण्यात आली. यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची गरज होती. मात्र सभापती निवडणूक घेण्यात येऊन यानंतर भाजपचे दत्तात्रय गायकवाड सभापती झाले. त्यांना सभापती म्हणून अवघा तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
पात्र व्यापारी, अडते यांची मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी बाजार समितीच्या सचिवांची आहे. ग्रामपंचायत सदस्यांची यादी पंचायत समितीचे बीडीओ तयार करणार आहेत. तर सेवा संस्थांच्या प्रतिनिधींची यादी तालुका उपनिबंधक तयार करणार आहेत. या सर्वांनी १७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रारूप मतदार यादी पाठवायची आहे. यानंतर हरकत, सूचनांसाठी ती प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर लगेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम तयार करून जिल्हा उपनिबंधक ती जाहीर करणार असल्याचे समजते.
कृषी उतपन्न बाजार समिती मतदार याद्या तसेच बाजार समिती निवडणूक प्रोग्राम संदर्भात उपनिबंधक ठाणे शांताराम चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार याद्या सादर करण्या संदर्भात 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुद्दत असून त्याअंती 45 दिवसांत निवडणूक प्रक्रिया प्रोग्रॅम जाहीर होईल.
कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय एडके यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार प्राथमिक याद्या तयार असून अंतिम तारेखच्या आत अंतिम मतदार याघी सादर करणार असल्याचे सांगितले.
Post a Comment
0 Comments