भ्रष्टाचाराची जणू चढाओढच सुरू आहे
दीड लाखाची लाच घेताना लिपीक अडकला
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ही समावेश ?
कल्याण डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराचं कुरण संबोधलं जातं. त्यामुळेच आतापर्यंत या महापालिकेत लिपीकापासून ते अगदी उपायुक्तापर्यंत अनेकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
प्रशांत धीवर हा कल्याण डोंबिवली महापालिकेत लिपीक यापदावर आहे. त्याला दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हे पैसे आपण स्वत:साठी नाही तर केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासाठी मागितले होते असा धक्कादायक खुलासा त्याने तपासा दरम्यान केला आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना कधीही अटक होऊ शकते. प्रशांत धीवस याला कल्याण कोर्टाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोकड सापडल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली होती. या प्रकरणात केडीएमसीचा बाजार परवाना विभागाचा लिपीक प्रशांत धीवर याला दीड लाख रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली . धीवर याने कल्याणमधील एका मटण विक्री दुकानाचा परवाना हस्तांतर करण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती. तडजोड होऊन दीड लाख रुपयांवर व्यवहार ठरला. तेच पैसे घेताना त्याला अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्याला घरी घेऊन गेले. त्याच्या घरात देखील काही प्रमाणात दागिने आणि रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत धीवर याने अटकेनंतर खुलासा केला आहे की, त्याने हे पैसे स्वत: साठी नाही तर उपायुक्त अवधूत तावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्यासाठी मागितले होते. त्यांच्या आदेशावरुन हे काम करत होतो. धीवर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका ही भ्रष्टाचारासाठी ओळखळी जाते. यापूर्वी मालमत्ता विभागाचे तत्कालीन उपायु्कत सुरेश पवार यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर केडीएमसीचा बहुचर्चित तत्कालीन अभियंता सुनिल जोशी याला पाच लाखाची लाच घेताना अटक करण्यात आली होती. सुनिल जोशी याचे लाच प्रकरण खूपच गाजले होते. त्याच्या बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब करताना अधिकारी थक्क झाले होते. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला बेकायदा बांधकाम प्रकरणी आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्याच्या लाचेचे प्रकरणही खूप गाजले होते.
Post a Comment
0 Comments