ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सर्व भूषणांमध्ये वक्तृत्व हे चिरकाल टिकणारे भूषण आहे. पण आज लोकशाहीच्या, इंटरनेटच्या, ईमेलच्या युगात माणसातील संवादच हरवत चालला आहे. त्यातून भावी काळातील उत्तम वक्त्यांची जडणघडण व्हावी हे उद्दिष्ट ठेवून बालक मंदिर संस्थेचे संस्थापक कै. इंदुताई देवधर व कै. वा. शि. आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्था सन २००५ पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील तसेच सन २००७ पासून ठाणे जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यंदाचे या स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे.
तसेच भारताचे भवितव्य भारताच्या ज्ञान मंदिरात घडविले जाते. समाज परिवर्तनाच्या चक्राला गती देण्याचे काम शाळांमधून सर्व शिक्षक नेहमीच करत असतात. शिक्षणक्षेत्रात अनेक बुद्धिजीवी आणि व्यासंगी शिक्षक मनापासून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. या क्षेत्रातील आपल्या अनुभवातून, ज्ञानातून आणि चिंतनातून शिक्षकांना विविध शैक्षणिक विषयांवर लिहिण्यास प्रेरित करावे हे उद्दिष्ट समोर ठेवून संस्था शिक्षकांसाठी दरवर्षी खुली निबंध स्पर्धा ही आयोजित करत असते.
यावर्षी ही स्पर्धा मंगळवारी बालक मंदिर संस्थेमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेसाठी मराठी व इंग्रजी माध्यम मिळून २४२ विद्यार्थ्यांनी सहभाग दशर्विला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बालक मंदिर संस्थेचे विश्वस्त डॉ. वसंतराव काणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांनी केले. ईशस्तवन व स्वागतगीत कामिनी पाटील व पसायदान आरती सराफ यांनी सादर केले. स्पर्धा प्रमुख म्हणून वैदेही बागुल यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
Post a Comment
0 Comments