ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पारंपारिक वेशभूषा, फेटे घालून ढोल ताशांच्या गजरात अनुपम नगर गेट- योगीधाम चौक ते गुरुआत्मान सर्कल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वचजण सहभागी झाले होते.
माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी शिव व्याख्याते संदिप पाटील यांच्या शिव व्याख्यानाचे आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासणारा वारसा महाराष्ट्राचा या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितिन जाधव यांनी दिली. तर योगीधाम परिसरातील मराठी माणणसांच्या न्याय हक्कांसाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम देखील राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितिन जाधव, सचिव अतुल सरगर, खजिनदार जितेंद्र सावंत, पदाधिकारी चेतन निकम, अनघा देवळेकर, विशाल यशवंतराव, सुरेंद्र परब, गणेश नाईक, पंकज ठाकरे, संग्राम पाटील, धम्मराज इंगळे, किरण सकपाळ, वैशाली गरुड, संदिप अंत्रे, प्रमोद गायकवाड, संजिव गायकवाड, आतिष जाधव, सुरज पातकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments