ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने उर्जा संवर्धन व सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. मंगळवारी नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या १३ व्या ग्रीन एनर्जी समिती मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ५ वा ग्रीन उर्जा व उर्जा संवर्धन पुरस्कार देवून सन्मानित केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देश स्तरावर सौर उर्जा क्षेत्रात व महापालिकेच्या विविध विभागात उर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेवून संपूर्ण देशातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवड केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सन २००७ पासून महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर सौर उर्जा सयंत्रे आस्थापित करणे विकासकांना बंधनकारक केले आहे. त्याकामी महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रभावी यंत्रणा तयार करुन प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली आहे. सन २००७ ते २०२१ या कालावधीत एकूण १८३२ इमारतीवर १ कोटी ८ लक्ष लीटर्स प्रती दिन क्षमतेचे सौर उष्ण जल सयंत्रे विकासकाकडून आस्थापित केलेले आहे. त्यामुळे इमारतीमध्ये गिझरचा वापर न होता प्रती वर्ष १८ कोटी वीज युनिटची बचत होत आहे. सन २०२१ पासून महानगरपालिकेने विकासकांना रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प आस्थापित करणे बंधनकारक केले असून आजपर्यंत १९७ इमारतींवर ३.६ मेगा वॅट क्षमतेचे रुफ टॉप नेट मीटर सौर उर्जा निर्मिती करणारे प्रकल्प विकासकाकडून आस्थापित करुन घेतल्याने प्रती वर्ष ५२ लक्ष विज युनिट सौर उर्जा निर्मिती होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभागक्षेत्र कार्यालयासाठी एकूण १६० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे कार्यान्वित केलेली आहेत. महापालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण प्रकल्प व कपोते वाहनतळ येथे प्रत्येकी १२० किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी सयंत्रे आस्थापित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या १५ इमारतीवर ०.४४ मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा सयंत्रे आस्थापित असून प्रतिवर्षी ६.३४ लक्ष सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.
उर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने महापालिका निधी व स्मार्ट सिटी च्या माध्यमातून शहरातील जुने परंपरागत सोडीयम दिवे काढून उर्जा बचत करणारे एल.ई.डी पथदिवे बसविलेले आहेत. उर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेच्या दोन्ही रंगमंदिरातील परंपरागत चिलर काढून उर्जा कार्यक्षम व उर्जा बचत करणारे चिलर व महापालिका कार्यालयांमध्ये उर्जा बचत करणारे २८ वॅट क्षमतेचे सिलीग फॅन व एल.ई.डी. लाईट्स बसवून उर्जा संवर्धन क्षेत्रात सुध्दा भरीव कामगिरी केली आहे.
उर्जा संवर्धन व सौर उर्जा वापर याबाबत महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धक व नागरीकांमध्ये वेगवेगळ्या महोत्सवामध्ये व मोठ्या रहीवासी सोसायटी येथे पथनाट्य व उर्जा संवर्धन गीतच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमणात जनजागृती केली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
Post a Comment
0 Comments