Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अभिजात मराठीच्या गौरवासाठी

 

                 ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

 २७ फेब्रुवारी! मराठी भाषेतील अग्रेसर कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून सर्व महाराष्ट्राला सुपरिचित असणारे एक आदरणीय साहित्यिक व्यक्तिमत्व विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. इसवी सन १९८७ च्या तेविसाव्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी, इसवी सन १९८९ मध्ये मुंबई येथे भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष, इसवी सन १९६४ मध्ये मडगाव गोवा येथे भरलेल्या ४५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, इसवी सन १९७० मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, नाट्यक्षेत्रात सर्वोत्तम असणाऱ्या गडकरी पारितोषिकाचे पहिले मानकरी आणि पुणे विद्यापीठाने डी.लिट. या सन्मानदर्शक पदवीने सन्मानित केलेले कवींचे कवी, थोर नाटककार वि. वा. शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब यांचा जन्मदिवस! वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यक्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीचा सर्वांना अभिमान वाटावा यासाठी २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्या २१ जानेवारी २०१३ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व उत्साहाने साजरा केला जातो.

वि. वा. शिरवाडकरांनी त्यांच्या साहित्य लेखनातून मराठी साहित्य क्षेत्रात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. मराठी सारस्वताची त्यांनी अखंडपणे सेवा केली. साहित्य क्षेत्राला नवा आयाम व नवे वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळेच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून त्यांस अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. 

मराठी ही आपली मायबोली आहे, याचा आपल्याला अभिमान आहे.                   

  “लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी।                                  जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी।                            

धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी।                       

एवढ्या जगात माय, मानतो मराठी!” 

ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. 

मराठी भाषेची परंपरा अत्यंत उज्ज्वल आणि समृद्ध आहे. तिचे इतिहास, साहित्य, संतपरंपरा, लोकसंस्कृती, आणि सामाजिक योगदान हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मराठी भाषा सुमारे १००० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. १२व्या शतकातील यादवांच्या काळात तिचा वापर लिपीमध्ये झाला. अनेक शिलालेख, ताम्रपट आणि हस्तलिखिते यावरून तिचा इतिहास दिसून येतो. मराठी भाषेच्या समृद्धीला संतांच्या साहित्याने मोठे योगदान दिले. संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) यांनी 'भावार्थदीपिका' म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली, जी मराठीत पहिली महाकाव्यात्मक टीका होती. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी आणि ओवी साहित्यातून समाजाला आत्मबळ दिले. या संतपरंपरेतून ओव्या, अभंग, विराणी, गौळणी यासारखे साहित्य विकसित झाले. संत, पंत व तंत या साहित्य प्रवृत्तींनी अनेक साहित्यिक व त्यांच्या साहित्यिक रचनांनी मराठी भाषेचे दालन समृद्ध केले. 

मराठी भाषेने स्वराज्य स्थापनेच्या चळवळीत मोठी भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतच प्रशासन चालवले. त्यांच्या काळात मराठीत राज्यव्यवहार कोष, राज्यकारभार पत्रव्यवहार, आणि हुकुमनामे प्रसिद्ध झाले. पुढे १८व्या आणि १९व्या शतकात मराठीत अनेक उत्तम लेखक आणि विचारवंत साहित्यिक उदयास आले. लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर, टिळक गोखले, रानडे यांनी समाजसुधारक लेखन केले.

प्रेमचंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या तोडीस तोड साहित्यकार मराठीतही होते. वि.स.खांडेकर, पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर, प्र.के.अत्रे, विंदा करंदीकर शांता शेळके, शिवाजी सावंत आदींचे अमूल्य योगदान आहे. 

मराठीत लोककलेला मोठा वारसा आहे. लावणी, भारूड, गोंधळ, तमाशा या कला मराठीतूनच विकसित झाल्या. पारंपरिक गीते, कोळीगीतं, गोंधळगीतं, पोवाडे हे लोकसाहित्याच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. मराठी भाषेतील वर्तमानपत्रांची भूमिकाही महत्वाची मानली जाते. १८४० मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. लोकमान्य टिळकांचे ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या पत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच चित्रपट व नाटकांची भूमिकाही महत्वाची मानली जाते. दादासाहेब फाळकेंनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला चित्रपट तयार केला, जो मराठीत होता. मराठी नाट्यसृष्टीत केशवसुत, राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर, पी. एल. देशपांडे यांचा मोठा वाटा आहे. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातही मराठी भाषिकांनी मोठे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयंत नारळीकर, मोहन आगाशे, आनंद यादव अशा विचारवंतांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे.

अर्थातच, मराठी भाषा ही केवळ संवादाचे, भाषिक व्यवहाराचे साधन नसून संस्कृती, साहित्य, विचार, कला आणि समाजजागृतीचा आधारस्तंभ आहे. तिच्या उज्ज्वल परंपरेचा आपण अभिमान बाळगायला हवा आणि तिचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

परंतु आज काही गोष्टी पाहता, आपल्या मायबोली मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे मला वाटते.  आपल्या मायबोलीच्या अस्तित्व व विकासासाठी आपण नियमितपणे काहीतरी भरीव कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कवी यशवंत म्हणतात, 

”हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू                  

हिला बैसवू वैभवाच्या शिखरी“

आपणही मायबोली मराठी भाषेचे सुपुत्र म्हणून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी, मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी मराठीत सदैव लेखन, वाचन व मनन करणे स्वरचित असे नवनवीन साहित्य लेखन निर्माण करणे, आदी प्रयत्न केले पाहिजेत. 

मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर माउलींनी “माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके; ऐसी अक्षरे रसिके मेळविन”  असा विडा उचलला तद्वतच आपणही मराठी भाषेची प्रगती व उन्नती  साधण्यासाठी प्रयास करावा. एकमेकांशी संवाद साधताना मराठीचाच आग्रह धरावा. आपल्या मित्रांशी, नातेवाईक यांच्याशी बोलताना केवळ मराठीतूनच बोलावे. अन्य भाषिकांशी बोलतानाही शक्यतो मराठीतूनच बोलावे. व्हाट्सऍप, फेसबूक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर इतरांशी संवाद साधताना इंग्रजी भाषेऐवजी मराठी भाषेचा वापर करून संवाद साधणे, ही काळाची गरज आहे. नाहीतर आपली मायबोली मराठी नामशेष झाल्याशिवाय राहणार! आपली घरे, आपल्या इमारती, कार्यलये, दुकाने यांच्या नावांच्या पाट्या शक्यतो मराठीतूनच टाकण्याचा प्रयत्न करावा. आपल्याजवळील गाड्यांवरील क्रमांकही मराठीत टाकावेत. आपल्या गावातील वा परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची नावेही मराठीतूनच टाकण्याचा आग्रह धरल्यासही कदाचित मराठीला नवे वैभव प्राप्त होऊ शकेल. आपल्या राजभाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे! त्यामुळे आता आपल्या सर्व मराठी भाषिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. हा अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मराठी भाषिक असणाऱ्या आपण सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषिक कार्यक्रम व उपक्रम यांचे उत्तम नियोजन करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या मायबोली मराठीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे एकजुटीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे!  नुकतेच दिल्ली येथे मराठी भाषकांनी जसे उत्तम प्रकारे राष्ट्रीय पातळीवरील साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केले. तद्वतच मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शासनाने आणि अनेक संस्थांनी, मंडळांनी व व्यक्तींनी समर्पण भावनेने व सचोटीने निरंतर प्रयत्न करणे काळाची गरज आहे. अनेक स्तरांवर भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी वेळोवेळी विविध स्पर्धा, उपक्रम, कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखतीचे कार्यक्रम, साहित्य व काव्य संमेलने आयोजित केली पाहिजेत.  मराठी भाषेतील संशोधन कार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. ठिकठिकाणी अधिकाधिक वाचनालये व ग्रंथालये निर्माण केली पाहिजेत. मराठी भाषक व्यक्तींनी वाचन चळवळ व ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत व सहकार्य केले पाहिजे.  जगातील विविध देशांमध्ये आपले आयटी क्षेत्रात जे कार्य करतात किंवा जे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांनी  आणि इतर जाणकार व्यक्तींनी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या मायबोली मराठीतील अनमोल अशा साहित्याची डिजिटल स्वरूपातील उपलब्धता अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषेतील अनेक दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके व इतर साहित्य सर्वांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  त्यासाठी शासनाने व सेवाभावी संस्थांनी तसेच उद्योजक व मराठी प्रेमी  दानशूर व्यक्तींनी  आर्थिक पाठबळ दिले पाहिजे.  आपण प्रत्येकाने आपला मराठी बाणा मनात जपला पाहिजे. त्यामुळेच आपली मायबोली आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अधिक व्यापक स्वरूप धारण करून विकसित होऊ शकेल.  तेव्हाच माऊलींचे “इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी” हे बोल आपण वास्तवात आणू शकू! आणि “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,                                     

हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा!”

ही कुसुमाग्रज यांनी दिलेली  शिकवणही आपण मनात कोरली पाहिजे. मायबोली मराठी भाषा समृद्ध व विकसित करण्यासाठी तिच्या गौरवशाली व समृद्ध परंपरेची जाण आपल्या मनामनांत सदैव राहिली पाहिजे. मराठी साहित्याचा वारसा जपणे व साहित्याची उज्ज्वल परंपरा जपणे, हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषेचा एक निष्ठावंत पाईक म्हणून आपल्या अभिजात मराठीच्या गौरवासासाठी आपण हे प्रयत्न कराल, हा आशावाद व्यक्त करतो. 


शारदासुत सुनील म्हसकर (कल्याण)

Post a Comment

0 Comments