Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संत रवीदास यांच्या कार्याचा प्रभाव साडेसहाशे वर्षानंतरही कायम - माजी आमदार नरेंद्र पवार

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
१६ व्या शतकातील भक्ती चळवळीचे भारतीय गूढ कवी-संत अशी ओळख असलेल्या संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या कार्याचा प्रभाव 648 वर्षानंतरही कायम असल्याचे उद्गार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काढले आहेत. संत शिरोमणी रवीदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार बोलत होते. 


यावेळी झालेल्या संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाला कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड, कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, भाजपा मंडल अध्यक्ष संजय मोरे,  आयोजक आणि संस्थापक राम बनसोडे, अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, महिला अध्यक्षा मंगल गायकवाड, सचिव बाळासाहेब वाघमारे, खजिनदार गंजेंद्र राऊत, उपाध्यक्ष आबा कांबळे, कार्याध्यक्ष प्रकाश लांडगे, सहसचिव अमित उगले, माजी महिला अध्यक्षा कविता रूपवते, हनुमंत गायकवाड, प्रमोद जळगांवकर, मनोज वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संत शिरोमणी रवीदास महाराज यांनी आयुष्यभर आपल्या ईश्वरभक्तीच्या माध्यमातून तत्कालीन समाजातील असमानता, भेदभाव आणि अनिष्ट रूढी परंपरांवर बोट ठेवले. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या श्लोक आणि भक्तीगीतांतून समाजाला जागृत करण्याचेही काम केले. संत शिरोमणी रवीदास महाराज यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचाही संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश असून आज तब्बल 648 वर्षानंतरही संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या कार्याचा प्रभाव कायम असल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले. 

यासोबतच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देशाच्या सुदृढ लोकशाहीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा आवर्जून उल्लेख केला. या संविधानाने आज देशातील गरिबात गरीब असो की कितीही श्रीमंत व्यक्ती, या दोघांनाही जगण्याचा समान अधिकार प्राप्त झाल्याची भावना अधोरेखित केली. दरम्यान यावेळी वैद्यकीय, शिक्षण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोहिदास समाजाच्या कर्तृत्ववान व्यक्तींचा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.

Post a Comment

0 Comments