Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

परीक्षा केंद्रांच्या अदलाबदलीस शिक्षण क्रांती संघटनेचा विरोध

 कॅापी नियंत्रणासाठी परीक्षा केंद्रांची                   अदलाबदली म्हणजे                    "डोळ्यात केर अन् कानात फुंकर"

                                                     -सुधीर घागस

निर्णयास शिक्षण क्रांती संघटनेचा प्रखर विरोध

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कॅापी मुक्त व तणाव मुक्त दहावी बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक व शिपाई यांची परीक्षा केंद्रे बदलणे म्हणजे “डोळ्यात केर अन कानात फुंकर” असे चालले असल्याची प्रखर टिका शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी केली आहे. नुकतेच व्हिडीओ कॅान्फरन्सींगद्वारा राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय शिक्षण मंडळांना याबाबत निर्देश दिले आहेत.

 वर्षानुवर्षे दहावी बारावीच्या ठराविक परीक्षा केंद्रांवर कॅापी चालत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. परंतु अशी परीक्षा केंद्रे फार मोजकी असून त्यांवर आळा घालण्याऐवजी सरसकट राज्यातील परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची आदलाबदल करणे अत्यंत अयोग्य असून त्यास शिक्षण क्रांती संघटनेने प्रखर विरोध दर्शविला आहे. राज्य मंडळाने आपला हा तुघलकी निर्णय मागे न घेतल्यास प्रसंगी दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येईल असेही संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी सांगितले.

 शहरात शाळा दोन सत्रांत भरत असतात. दहावी बारावी परीक्षांच्या वेळानुसार शाळेतील नियमित अध्यापनाचे कामही शाळांमध्ये सुरू असते. शहरी भागात सकाळपासूनच ट्राफिकची मोठी समस्या असते. यामुळे नियमित शालेय कामकाज करून बदललेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचणे अवघडच नव्हे तर अशक्य आहे. अन्य परीक्षा केंद्रावर जायचे असल्यास नियमित अध्यापनाची वेळ कशी सांभाळायची अशी समस्या सर्व पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांसमोर उभी राहिली आहे. याशिवाय सद्या अपार आयडी जनरेट करणे, पॅटचे पेपर, इतर सर्व ॲानलाईन सुरू असलेली कामे वेळेत होऊ शकणार नाहीत. मंत्रालय, आयुक्त शिक्षण, संचालक, बोर्ड अध्यक्ष यांमध्ये समन्वय नसल्याचेही यावरून लक्षात येत आहे. एकीकडे सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य केले जाते मात्र त्यासाठीच्या खर्चाची तरतूदही शासन करत नसल्याचे सुधीर घागस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

परीक्षा केंद्रांची आदलाबदल न करता बैठे पथक, भरारी पथक व अन्य उपाययोजना आखून होणारा मानसिक त्रास, वेळेचा व खर्चाचा अपव्यय राज्य शिक्षण मंडळाने टाळावा व संबंधितांना दिलासा द्यावा अन्यथा असहकार पुकारण्यात येईल असा ईशारा सुधीर घागस यांनी निवेदनाद्वारे राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments