ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय,कल्याण या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भोसले गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ ज्ञानदानासाठी सक्रिय आहेत. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, मुंबई या संस्थेचा मानाचा सावित्रीबाई फुले महिला आदर्श शिक्षिका -2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि दहा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिक्षणाचा वसा हाती घेतलेल्या सावित्रीमाईच्या लेकीला त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्रा. गजानन डोंगरे चेतना महाविद्यालय, वांद्रे आणि डॉ. मृणालिनी आहेर YCMOU सायन्स इन्स्टिटयूट, सातारा यांच्याहस्ते देण्यात आला. SEM UNIT, मुंबईचे सर्व पदाधिकारी, शाम शिरसाट, धर्मेंद्र रामटेके, शशांक शेडगे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम साकार झाला. या विशेष पुरस्कारासाठी विद्यार्थी,पालक आणि समाजातील विविध क्षेत्रातून शुभांगी भोसले यांचे कौतुक होत आहे.
शुभांगी भोसले या सृजनशील विद्यार्थीप्रिय, कर्तव्यनिष्ठ शिक्षिका असून वक्तृत्व, गायन, भाषा विषयाच्या मार्गदर्शक शिक्षिका असून चार वर्षांपासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आतापर्यंत 75 पेक्षा जास्त विषयावर काव्यलेखन, अभ्यासपूर्ण लेख शिक्षणविवेक, चैत्रपालवी, ओऊळ, रानगंध यांसारख्या मासिकात छापून आले आहेत. जाई जुई नावाचा प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
उत्कृष्ठ सूत्रसंचलनामुळे त्या उपस्थितांची दाद मिळवतात. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक दिग्गज विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. अभिनय, कला, क्रीडा, नौदल, आणि लष्कर सेवेतील त्यांचे माजी विद्यार्थी आजही त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध जपत आहेत.
माजी विद्यार्थ्यांनी त्यांना ज्ञानाई पुरस्काराने सन्मानित केले होते. याच बरोबर त्यांना कल्याण नागरिक आदर्श महिला पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, सावित्रीच्या लेकी सन्मान यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
Post a Comment
0 Comments