Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याच्या केडीएमसीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा - केडीएमसी उपआयुक्त अतुल पाटील

शाडुच्या श्री गणेश मूर्तीसाठी केडीएमसीचा पुढाकार 

शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याच्या  केडीएमसीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा -                                       --- केडीएमसी उपआयुक्त अतुल पाटील


                          ब्लॅक अँड व्हाईट
 कल्याण वार्ताहर :पर्यावरण पूरक म्हणजेच शाडुच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी केले. फेब्रुवारी मध्ये असणा-या माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील कारखानदार, मूर्ती विक्रेते, मूर्तीकार यांच्या समवेत महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

पीओपी च्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत, परिणामी जलस्त्रोतातील प्रदुषणात वाढ होवून पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्याकडील दि. 12 मे 2020 रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार नदी, खाडीचे प्रदुषण व नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने पीओपी च्या मूर्तींवर बंदी जाहीर केली आहे. या अनुषंगाने महापालिका क्षेत्रामध्ये पीओपी च्या वापरावर (मूर्ती बनविणे) बंदी घालण्यासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले, पुनरावर्तन संस्थेच्या मयुरी कुंभार, मनुश्रुष्टि पर्यावरण समंत्रक वैशाली तांबट आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कल्याण हे प्रामुख्याने रेसिडेन्सीयल हब आहे. मुंबईत दररोज जाणारे असंख्य चाकरमानी कल्याण मध्ये राहतात, त्यामुळे येथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पीओपीच्या मूर्तीं बनविण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, असे आवाहन पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी या बैठकीत केले.


महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तीकारांना जागा व माती महापालिकेमार्फत विनामुल्य उपलब्ध दिली जाईल.  सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 72 मूर्तीकारांना तसेच अनेक संस्थांना महापालिकेमार्फत 50 टन  शाडू मातीचे विनामुल्य  वाटप  करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.

पुनरावर्तन संस्थेच्या मयुरी कुंभार तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच मनुश्रुष्टि पर्यावरण समंत्रक वैशाली तांबट यांनी सिपीसीबी  गाईड लाईन्स , उच्च न्यायालयाच्या मनाईनुसार पीओपी बंदी, वायुप्रदूषण व जलप्रदूषण, बाबत सविस्तर माहितीवजा प्रेझेंटेशन सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थित असलेल्या मूर्तीकारांनी महापालिकेच्या या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला.


Post a Comment

0 Comments