एक युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौ. चंदाराणी माधव कुसेकर. महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका ठाणेजिल्हा परिषद शाळा माणेरे ता. अंबरनाथ
शिक्षणाला वंचित समाज उन्नतीचे साधन मानले आणि अनेक शिक्षण संस्थांची स्थापना केली. सोनियाची उगवली सकाळ, जन्मा आले भीम बाळ..!! सोनियाची ही सकाळ उगवली होती १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महु या गावी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न ,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माने..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी दलित, वंचित आणि शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात खूप मोठे परिवर्तन घडवले.
डॉ. आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले. त्यांचे वडील रामजी हे पेशाने शिक्षक होते. त्यांनी संत कबीर, महात्मा फुले आणि भगवान गौतम बुद्धाना आपले गुरु मानले. १९०७ मध्ये ते मॅट्रिक पास झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजात झाले. बडोदे सरकार यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ (अमेरिका) व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले. अर्थशास्त्र, कायदा, आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले.
भारतात परत आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी वकिली सुरु केली. परंतु वरिष्ठ न्यायालयात काम करताना त्यांना अस्पृश्य म्हणून वागणूक मिळू लागली.याचा त्यांना खूप त्रास झाला. स्त्रियांचा हक्क, विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण या गोष्टीत जोपर्यंत सुधारणा होत नाहीत तोपर्यंत अस्पृश्यता हटवणे अशक्य आहे म्हणून त्यांनी "मनुस्मृती” या प्राचीन ग्रंथाचे दहन केले. अस्पृश्यांना महाडच्या तळ्यावर पाणी पिण्यास बंदी होती या न्यायाविरुद्ध त्यांनी "महाडचे चवदार तळे सत्याग्रह" करून ते तळे दलितांसाठी खुले केले. हे त्यांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांतीचे मोठे टप्पे ठरले. नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे काळाराम मंदिर सत्याग्रह केला. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी संघर्ष केला. त्यांनी जातिव्यवस्थेवर कठोर टीका करत समानतेचा संदेश दिला. समता आणि बंधुभावासाठी अविश्रांत कार्य केले.
हक्क मागून मिळत नसतात तर ते मिळवावे लागतात अशी स्फूर्तीदायी, स्वाभिमानाची शिकवण बाबासाहेबांनी पददलितांना दिली. घटना समितीत ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचे भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला. भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार देऊन देशात लोकशाही मूल्यांची रुजवात केली आहे. म्हणूनच त्यांना “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार” म्हणून गौरविण्यात येते.
डॉ. आंबेडकर यांनी कृषी, कामगार आणि उद्योग सुधारणा यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सांगितले, तसेच जलव्यवस्थापन, विशेषतः दामोदर, महानदी व इतर नद्यांचे जलप्रकल्प सुचवले.
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश त्यांनी दिला. त्यांनी
मूकनायक,समता, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. त्यांनी “हु वेअर द शुद्राज: हिंदू कोड बिल ”, “पोझिशन ऑफ दि वूमन इन हिंदूझम अँड बुद्धिझम”, “ बुद्ध अँड हिज धम्मा”, “ प्रोब्लेम ऑफ द रुपी”, थॉटस ऑन पाकिस्तान”,” पार्लमेंटरी डेमोक्रॅसी” इत्यादी पुस्तके लिहिली. त्यांनी स्वताची अशी विचारसरणी मांडली आणि स्वतःच्या बुद्धीला पटेल असेच वागले..
पिढ्यांनुपिढ्यांच्या, जीर्ण रुढींच्या शृंखलांना तोडिले.. बुद्धाविना नाही कुणा हात भीमाने जोडिले...!
सामाजिक विषमतेला विरोध म्हणून दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी भदन्त चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी लाखो अनुयायांसह जो समता व मानवतेचे प्रतीक आहे असा बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्माचा प्रचार केला, काही काळ बौद्ध धर्माच्या छायेत घालवला. डॉ. आंबेडकर यांची सत्यशोधक वृत्ती, प्रगल्भ विचारसरणी, लोकशाही मूल्यांवरील विश्वास, मानवतावादी दृष्टिकोन वैशिष्ट्ये आपण आचरणात आणायला हवीत.
डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणारे नेतृत्व, अस्पृश्य समाजाला आत्मसन्मानाची जाणीव देणारे महानायक, आधुनिक भारतातील समतेचे प्रतीक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांची ज्योत प्रज्वलित केली, जी आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतील. म्हणूनच, डॉ. आंबेडकर यांना युगपुरुष म्हणून ओळखले जाते. अशा हा युगपुरुष ६ डिसेंबर १९५६ रोजी अनंतात विलीन झाला. त्यांच्या या महापरीनिर्वान दिनानिमित्त माझे शतशः नमन ....!
.jpg)


Post a Comment
0 Comments