दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस संस्थेचा ३५ वा वर्धापन दिन साजरा
ब्लॅक अँड व्हाईट
( डोंबिवली) वार्ताहर : दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्टस संस्थेच्या कल्याण डोंबिवली केंद्राची स्थापना ११ नोव्हेंबर १९९० साली झाली होती. या वर्षी केंद्राचा पस्तीसावा वर्धापन दिन शनिवारी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी डोंबिवली जिमखाना येथे साजरा केला गेला.
ह्या कार्यक्रमाला शीर्षक "आविष्कार - मागोवा वाटचालींचा वेध भविष्याचा" हे देण्यात आले होते. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी माजी अध्यक्ष श्री. शरद जोगळेकर व सभासद श्री. हेमकांत भिसे ह्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष श्री. केशव चिकोडी ह्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असे सांगितले कि, कुठलीही संस्था एका रात्रीमध्ये उभी राहत नाही व कोण्या एका माणसामुळे पण उभी राहू शकत नाही. त्याच्यासाठी अनेक सभासदांना वर्षानुवर्षे सातत्याने काम करावे लागते, तेव्हा कुठे संस्था नावारूपाला येते. त्यांनी मागील वर्षातील संस्थेचा नव वर्ष स्वागत यात्रेमधील सहभाग, शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या वास्तुकला महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, कल्याण, डोंबिवली व बदलापूर मधील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच तरुण सभासदांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले व संस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
श्रीमती धनश्री भोसले ह्यांनी मागील वर्षामध्ये संस्थेने जोडलेल्या नवीन सभादांचा व संस्थेच्या "फेलो मेंबर्स" चा आढावा घेतला आणि संस्थेचे सभासद नसलेल्या व्यक्तींना सभासद होण्याविषयी आव्हान केले. संस्थेचे कोषाध्यक्ष विनायक पाटणेकर ह्यांनी संस्थेला आर्थिक सहकार्य करण्याविषयी सर्व सभासदांना आव्हान केले. केंद्राचे सचिव श्री. उदय सातावळेकर ह्यांनी आतापर्यंत होऊन गेलेल्या माजी अध्यक्ष आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची सर्वांना ओळख करून दिली व ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
संस्थेच्या कार्यकारिणी समितीचे सभासद श्री. संदीप पाटील ह्यांनी "रेरा स्कॅम" उघडकीस आणला व त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी त्यांच्या बाजूने निकाल जाहीर केला. ह्या निकालामुळे सर्व सामान्य जनतेला स्थावर मालमत्ता खरेदी करताना होणाऱ्या फसवणूकीवर चांगलाच आळा बसणार आहे. त्यांच्या ह्या लढ्याची संस्थेने दखल घेतली व त्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार केला.
ह्या कार्यक्रमाला अग्निशमन कंत्राटदार निशान इंटरप्रायझेस व बांधकाम कंत्राटदार गायत्री कंस्ट्रक्शन ह्यांचे सहकार्य लाभले. ह्या नंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध सभासदांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवले.
.jpg)

Post a Comment
0 Comments