खडकपाडा पोलिसांनी केली जेष्ठ नागरिकां सोबत दिवाळी साजरी
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेनुसार आणि कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीतील एकटे राहणारे तसेच पती-पत्नीसह जोडीने राहणारे जेष्ठ नागरिक यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांनी योगीधाम येथील वरिष्ठ नागरिक सेवा संस्था ज्येष्ठ नागरिक मंडळ या ठिकाणी जाऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली व प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करून प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समवेत बसून दिवाळीचा फराळ देखील केला. यावेळी जेष्ठ नागरिकांनी विविध गाणी, कविता सादर केल्या तसेच आपल्या जीवनातील सुखद किस्से,आठवणी सांगितल्या. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची मुले ही सध्या परदेशात आहेत किंवा मुली देखील लग्न करून सासरी गेल्या आहेत.
जीवनाच्या संध्याकाळी ज्याची साथ आवश्यक असते असा जोडीदार अर्ध्यावरच साथ सोडून निघून गेल्याने काही ज्येष्ठ नागरिक एकटे पडले आहेत. त्यामुळे ते एकटे पणाचे जीवन जगत असताना एकटेपणातील काही क्षण पोलीस व समवयस्क मित्र मंडळी सोबत घालवून विरंगुळा होऊन आनंद मिळविल्याचे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. डॉ अमरनाथ वाघमोडे यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास पोलीस स्टेशन मध्ये इतर कोणालाही ने भेटता डायरेक्ट माझ्याकडे या मला भेटा आपली कोणतीही समस्या असली तर ती तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे अडीअडचणीच्या वेळेला जेष्ठ नागरिकांचा हेल्पलाइन क्रमांक 10 90 आणि डायल 112 याबाबत माहिती देऊन यावर संपर्क साधण्या बाबत आवाहन केले.
ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांनी आपुलकीने केली चौकशी आणि आमच्या सोबत दिवाळी साजरी करून जे खाकी वर्दीतल्या माणसाचे दर्शन घडविले त्याबद्दल पाणवलेल्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम आयोजित करण्याकरिता खडकपाडा पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे, पोलीस हवालदार साहेबराव पाटील, पोलीस हवालदार अविनाश पाटील, नवनाथ बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpg)



Post a Comment
0 Comments