ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचाराला मंगळवारपासून सुरुवात झाली. टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडाकेबाज कामगिरी आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्याकडून झालेली विकासकामे या जोरावर मतदार आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.
यावेळी टिटवाळा मंदिर परिसरापासून वाजत गाजत भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी,रिपाइं महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या त्या ठिकाणी स्थानिकांचा विश्वनाथ भोईर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
तर कोविडनंतरच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत धडाकेबाज लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील जनता आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, संजय पाटील, महिला शहर संघटक नेत्रा उगले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, संतोष (आप्पा) तरे, माजी नगरसेविका वैशाली भोईर, उपशहर प्रमुख विजय देशेकर, युवासेना उपशहर प्रमुख विकास भोई, शाखाप्रमुख रोशन चौधरी यांच्यासह किरण पाटील, अशोक चौरे, बबलेश पाटील, निता देशेकर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments