Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी..अजित पवार ॲक्शन मोडवर


मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

*महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत* 
*मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा*
*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*
*अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून* 
*एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश*
*महामार्गावरील कार्यक्षम वाहूतक व्यवस्थेसाठी* 
*रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा*
*मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचे पर्यायी रस्ते*
*उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये*

                   ब्लॅक अँड व्हाईट/मुंबई वार्ताहर 

- मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा व प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाश्यांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे, तसेच त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजविल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्र, या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर दर्जोन्नती, रुंदीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशी विविध कामे सुरु आहेत. महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत. काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यांचा दर्जा, त्यावरील खड्डे, वाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.



Post a Comment

0 Comments