ब्लॅक अँड व्हाईट कल्याण,वार्ताहर
आर्य गुरूकुल (नांदिवली) शाळेतील संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ. वैशाली गिरीश मंजुळे यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा ‘सर्वोत्कृष्ट शिक्षिका’ म्हणून गौरव करण्यात आला. गोल्डन एज प्रा. लि. यांच्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, संस्कार, शिस्त, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे कार्य वैशाली मंजुळे सातत्याने करीत आहेत. आर्य गुरूकुल शाळेत संस्कृत विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची गोडी लागावी, भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख व्हावी आणि आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा अभिमान निर्माण व्हावा, यासाठी त्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात.
शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करणे तसेच शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय ठरली आहे.
आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनच्या शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये वैशाली मंजुळे यांचा सक्रिय सहभाग असून, ‘एक हात मदतीचा... एक हात जाणीवांचा’ या भावनेतून समाजातील गरजू घटकांसाठी काम करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षकी पेशा यांचा सुंदर समन्वय साधत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या सन्मानाबद्दल आर्य गुरूकुल शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैशाली मंजुळे यांचे अभिनंदन केले. तसेच आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सचिन जाधव, सचिव श्री. विनोद शेलकर, खजिनदार श्री. गिरीश मंजुळे आणि संपूर्ण आविष्कार टीमच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
एक समर्पित शिक्षिका, संस्कृत भाषेची अभ्यासू मार्गदर्शक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी कार्यकर्ती म्हणून वैशाली मंजुळे यांचा झालेला हा गौरव त्यांच्या कार्याची पोचपावती मानला जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे आर्य गुरूकुल शाळेसह आविष्कार एज्युकेअर फाऊंडेशनच्या कार्यालाही नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments