Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कृत्रिम तलाव, ‘विसर्जन आपल्या दारी’च्या खर्चावर विजय देशेकरांचा आक्षेप

‘गणेशभक्तीला विरोध नाही, अवाजवी खर्चाला विरोध’
 ....विजय देशेकरांचा केडीएमसीवर निशाणा

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून गणेश विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलाव आणि ‘विसर्जन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या खर्चावर टिटवाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा टिटवाळा महोत्सवाचे मुख्य आयोजक विजय देशेकर यांनी आक्षेप घेतला आहे.

टिटवाळ्यातील डीजी वनजवळ कृत्रिम तलावासाठी ४ लाख ५९ हजार २६ रुपये, तर ‘विसर्जन आपल्या दारी’ या फिरत्या विसर्जन व्यवस्थेसाठी ५ लाख ४७ हजार ४६४ रुपये खर्चाचे टेंडर काढण्यात आल्याचे देशेकर यांनी म्हटले आहे. कमी खर्चात अशा सुविधा उभारता येत असताना एवढा मोठा खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


२०२४ मध्ये सामाजिक पुढाकारातून ५० हजार रुपयांच्या आत कृत्रिम तलाव उभारण्यात आल्याचा दाखला देत, मागील वर्षीच्या ३ लाख ९४ हजार रुपयांच्या कामाच्या दर्जाबाबतही त्यांनी तक्रार केली होती, असे त्यांनी सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर संबंधित तक्रारीवर काय कारवाई झाली, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमातून प्रत्यक्ष किती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले, कृत्रिम तलावांवर किती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रात यासाठी किती निधी खर्च होत आहे, याची आकडेवारी प्रशासनाने सार्वजनिक करावी, अशी मागणी देशेकर यांनी केली.

“गणेशभक्तांना सुविधा देण्यास विरोध नाही; मात्र जनतेच्या पैशांचा अवाजवी खर्च होऊ नये. करदात्यांच्या पैशांचा हिशोब प्रशासनाने द्यावा,” अशी भूमिका विजय देशेकर यांनी मांडली आहे.



Post a Comment

0 Comments