आमदार सुलभा गायकवाड यांनी केली
सखोल चौकशीची मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या शक्तिधाम मॅटर्निटी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत नवजात बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
नातेवाईकांचा आरोप आहे की, डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून आवश्यक निर्णय घेतला असता तर बाळाचा जीव वाचला असता. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईक आणि प्रशासनामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार सुलभा गायकवाड यांनी शक्तिधाम रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी मृत नवजात बाळाच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची बाजू जाणून घेतली. तसेच मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, नवजात बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते आणि उपचारादरम्यान वैद्यकीय हलगर्जीपणा झाला होता का, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments