ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली विविध विकासकामे संथ गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कामे युद्धपातळीवर आणि जलद गतीने पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मानव सहाय्यक सेवा मंडळाचे सचिव अम्मार काझी तसेच संस्थेचे पदाधिकारी व वरिष्ठ सदस्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
या संदर्भात संस्थेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात कल्याण पश्चिम परिसरातील गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. कल्याण हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून दररोज हजारो लोकल प्रवासी, तसेच एसटी बस व इतर वाहनांनी प्रवास करणारे नागरिक या परिसराचा वापर करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संथ विकासकामांमुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
जागोजागी सुरू असलेल्या कामांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे .अस्ताव्यस्त परिस्थितीमुळे परिसरात गुन्हेगारी, असुरक्षितता आणि प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
मानव सहाय्यक सेवा मंडळाने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने पुढील तीन महिन्यांच्या आत ही विकासकामे पूर्ण करावीत. जर ही कामे विहित मुदतीत पूर्ण झाली नाहीत, तर संस्थेला नाईलाजाने सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल. तसेच, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी पूर्णपणे संबंधित प्रशासनाची असेल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
या मागणीला आणि पत्राला संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव आव्हाड, सर्वश्री संजय वाजपेयी , डॉ. गिरीश लटके, प्रा . महेंद्र भावसार, रवीकुमार ढोमसे, दामोदर काबरा, प्रशांत म्हात्रे, शरद घुगे, प्रशांत तोष्णीवाल आणि योगेश शहा यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी भूमिका मांडली आहे. हा कल्याणकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न संस्थेने हाती घेतल्या बद्दल अनेक नागरिकांनी, प्रवाशांनी, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानून धन्यवाद दिले आहेत व सदर जनआंदोलनात सक्रिय सहभाग घेऊ असे सांगितले आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments