ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली, (विद्या कुलकर्णी)
गेल्या ४३ वर्षांपासून नाट्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवलीच्या ‘कलारंग’ या नृत्य कार्यक्रमाचे सादरीकरण यंदा गणेशोत्सवानिमित्त दिल्लीतील विविध महाराष्ट्र मंडळांमध्ये करण्यात येणार आहे. १७ व १८ सप्टेंबर रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकला संस्कार न्यासला गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने दिल्लीतील महाराष्ट्र मंडळांकडून गणेशोत्सवातील कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जात आहे. डोंबिवलीतून दिल्ली येथे गणेशोत्सवासाठी आमंत्रित होणारी ही एकमेव संस्था असल्याचे विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्राच्या विविध नृत्यपरंपरा आणि कलाविष्कारांचा परिचय करून देणाऱ्या ‘कलारंग’मध्ये तब्बल १२ कलाकारांचा संच सहभागी होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त दिल्लीतील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव या कार्यक्रमातून घेता येणार आहे.
श्रीकला संस्कार न्यासच्या दिपाली काळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शिल्पा कुलकर्णी व संतोष म्हापसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांची तयारी करण्यात आली आहे. नृत्य, संगीत आणि सादरीकरण यांचा सुरेख मिलाफ असलेला ‘कलारंग’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे.
डोंबिवलीच्या कलाक्षेत्रातील कलाकारांना व्यापक व्यासपीठ मिळावे आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांपर्यंत मराठी कलाविश्व पोहोचावे, या उद्देशाने श्रीकला संस्कार न्यास सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. दिल्लीतील हे आमंत्रण संस्थेच्या सांस्कृतिक कार्याची दखल घेणारे असून, डोंबिवलीच्या कलाविश्वासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments