ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे दोन्ही प्रमुख रुग्णालयांच्या वैद्यकीय विभागात मोठा बदल झाला आहे.
दोन्ही रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारी गैरसोय, उपचारासाठी तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा, कथित हलगर्जीपणा, रुग्णांशी गैरवर्तन तसेच ड्युटी व्यवस्थेबाबत गेल्या काही काळापासून तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चर्चेत होते. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रशासकीय फेरबदलानुसार डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉ. संतोष केंभवी, डॉ. कविता मढवी आणि डॉ. प्रशांत चौधरी यांची बदली कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आली आहे. तर रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. विनय कुंवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग पडवी आणि डॉ. संदीप पगारे यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली आहे.
याशिवाय डॉ. प्रतिभा पानपाटील यांची मुख्यालयातून शास्त्रीनगर रुग्णालयात, डॉ. विनोद दौंड यांची मुख्यालयात, तर डॉ. पौर्णिमा ढाके यांचीही बदली करण्यात आली आहे.
मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी या बदल्यांना दुजोरा देत, आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार हा फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले.
या प्रशासकीय फेरबदलामुळे दोन्ही रुग्णालयांच्या कामकाजात सुधारणा होऊन रुग्णांना वेळेत आणि अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments