Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणातील एपीएमसी मार्केट परिक्षा केंद्राच्या अनागोंदी कारभाराचा लिपिक पदाच्या परिक्षार्थीना फटका

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
                                                                     
कल्याण मधील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावर घेतलेल्या हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत  या केंद्राच्या अनागोंदी कारभारचा फटका परिक्षार्थी उमेदवारांना बसल्याने २५०हून अधिक परिक्षार्थीसह पालकांनी रविवारी संतप्त होत ठिय्या मांडला.  अखेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवित परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिक्षा केंद्राच्या ढिसाळ कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.       

एपीएमसी मार्केट परिसरातील हायकोर्ट क्लर्क टायपिंग स्किल टेस्ट दरम्यान झालेल्या गैरसोयींमुळे परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परीक्षार्थींच्या समस्या जाणून घेतल्या.

गायकवाड यांनी सांगितले की, “परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या परीक्षेची फेरपरीक्षा घेण्याची मागणी परीक्षा व्यवस्थापनाकडे करणार आहे.” ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका परीक्षार्थींनी घेतली आहे.     
                         
 प्राप्त माहितीनुसार  मुंबई हायकोर्ट लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला.  महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले होते, मात्र परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.
परिक्षेसाठी आसन व्यवस्थेचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. तसेच परीक्षा केंद्रावर कोणतीही स्पष्ट व्यवस्था व तपासणी नसल्याची तक्रार देखील विद्यार्थ्यांनी केली. अनेक संगणक धुळखात पडलेले होते, तर काही संगणक सुरूच होत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्धा तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचं समोर आलं आहे.

संगणक सुरू झाल्यानंतरही सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने टायपिंग टेस्ट रखडली आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 10 वाजताच्या सत्रातील उमेदवार अडकले असतानाच सव्वा बारा आणि 3 वाजताच्या सत्रातील शेकडो विद्यार्थीही परीक्षा केंद्रावर पोहोचल्याने गर्दी वाढली. जवळपास 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त करत निषेध आंदोलन केले. पालकांनीही व्यवस्थापनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे दूरवरून आलेल्या उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत , परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला. दरम्यान, संस्थेचे संचालक संजय वानखेडे यांनी तांत्रिक अडचणीमुळे प्रिंट प्रक्रिया उशिराने होत असल्याचे सांगत समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. या सर्व गोंधळाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये देखील संतापाचं वातावरण पहायला मिळाले. पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.  



Post a Comment

0 Comments