Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आयुक्तांच्या घराभोवतीही खड्ड्यांचे साम्राज्य


केडीएमसी प्रशासनाविरोधात नागरिकांचा

संताप

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका  क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून, आता मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत मार्गांपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे केडीएमसी आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरातील तसेच रामदासवाडी ते कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून केडीएमसी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. खड्डे बुजविणे आणि रस्त्यांचे पॅचवर्क करण्याबाबत अधिकाऱ्यांचे अनेकदा लेखी तसेच तोंडी लक्ष वेधले, मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

‘जनता त्रस्त आहे आणि प्रशासन कानात तेल घालून बसले आहे,’ असा आरोप भोईर यांनी केला. आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ये-जा असलेल्या रस्त्यांचीच अशी अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांतील रस्त्यांची परिस्थिती काय असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढला आहे. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी केडीएमसी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत आणि निकृष्ट पॅचवर्कऐवजी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Post a Comment

0 Comments