ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली | प्रतिनिधी
महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणाला आणखी वेग आला असून, डोंबिवलीतील शिंदे सेनेच्या युवासेनेचे सुमारे २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील महायुतीच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.
डोंबिवली येथील भाजप मंडल कार्यालयात कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि केडीएमसी गटनेते शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. युवासेनेचे विधानसभा समन्वयक अर्चित खडकुल यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
बैठकीतील वादामुळे नाराजी
प्रवेशानंतर अर्चित खडकुल यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाच्या बैठकीत काही युवा पदाधिकाऱ्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. तरुण कार्यकर्त्यांबाबत पक्षाची भूमिका समाधानकारक नसल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचा संघटन विस्ताराचा दावा
यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संघटना सातत्याने बळकट होत असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याचा दावा केला. आतापर्यंत जवळपास एक लाख नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले.
गटनेते शशिकांत कांबळे यांनी विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून पक्षात येत असल्याचे सांगत, युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीत पुन्हा कुरघोडीचे राजकारण
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेतल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मित्रपक्षाकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
अशा कुरघोडीच्या राजकीय वातावरणात आता शिंदे सेनेच्या युवासेनेतील २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा स्थानिक राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
.jpg)





Post a Comment
0 Comments