केडीएमसीला सात दिवसांचा अल्टिमेटम
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांविरोधात कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी 'खड्डे भरा' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंह यांनी केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ॲड. नवीन सिंह यांनी आरोप केला की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे व ब्लॉक होल भरण्यासाठी २५ कोटी ७० लाख रुपयांचे टेंडर काढले. मात्र एवढा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असताना शहरातील प्रमुख रस्ते आजही खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्यामुळे हा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. काँग्रेसने महापौर आणि महापालिका आयुक्तांना सात दिवसांचा अल्टिमेटम देत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. अन्यथा केडीएमसी मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात सलीम शेख, सत्यभामा जयसवार, रीना खांडेकर, वर्षा रसाल, अजित सिंह, अमोल गायकवाड, इमरान शेख, रंजीत दांगले, आजम शेख, सुभाष सिंह, सुशील उपाध्याय, मोहन गुप्ता, वजाहत खान, चेतन भंडारी, विमलेश शर्मा, वैभव पाठक, श्रेयस सिंह, किशोर मढवी, फिरोज शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
.jpg)



Post a Comment
0 Comments