१८८ कोटींच्या ड्रेनेज प्रकल्पाच्या ठेकेदाराला तक्रार मागे घेण्याची धमकी
संघटित रॅकेटचा पोलिसांना संशय
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आरटीआयच्या माध्यमातून सरकारी प्रकल्पांची कागदपत्रे मिळवून ठेकेदारांना तक्रारींची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने पर्दाफाश केला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील १८८ कोटी रुपयांच्या ड्रेनेज व सांडपाणी वाहिनी प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, या प्रकरणामागे संघटित खंडणी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षल केणे हे अजवानी-मेटाकॉन जॉइंट व्हेंचर कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. संबंधित कंपनी डोंबिवली एमआयडीसी परिसरात सुमारे १८८ कोटी रुपयांचा ड्रेनेज आणि सांडपाणी वाहिनी उभारणीचा प्रकल्प राबवत आहे. तपासात दीपेश गौतम लोखंडे (३४), राहुल सुधाकर मुकादम (३०), विशाल गंगाराम जानकर (३१) आणि नरेश सूर्यवंशी यांनी आरटीआयद्वारे प्रकल्पाची कागदपत्रे मिळवून एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला प्रकल्पाच्या एक टक्के रकमेची मागणी करण्यात आली. वारंवार तक्रारी करून काम बंद पाडण्याची धमकी देत अखेर १५ लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरविण्यात आला.
सततच्या त्रासाला कंटाळून कंपनीने गुन्हे शाखेशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बलवंत भराडे, एपीआय सर्जेराव पाटील, पीएसआय एस. एम. तावडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान दीपेश लोखंडेला १५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीनंतर राहुल मुकादम, विशाल जानकर आणि नरेश सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, वाहनांसह एकूण २१ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या चौघांविरुद्ध खंडणी, गुन्हेगारी धमकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ठेकेदारांना लक्ष्य करून खंडणी उकळणाऱ्या मोठ्या रॅकेटशी आरोपींचा संबंध आहे का, तसेच इतर ठेकेदारांनाही त्यांनी अशाच प्रकारे लक्ष्य केले आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments