Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण-डोंबिवली जलमय; मुख्य रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये पाणी, वीज खंडित

उघड्या वीज खांबांमुळे करंटची भीती; नागरिकांमध्ये संताप

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून अनेक सखल भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. वीजपुरवठा खंडित होणे आणि पाण्यात उघड्या वीज खांबांमधून करंट उतरत असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलभरावामुळे वाहतूक व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून अनेक वाहने रस्त्यातच अडकून पडली.

सर्वाधिक बिकट परिस्थिती कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोड येथे पाहायला मिळाली. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कचोरे (पॅनल-१८) परिसरात गटारे व जलनिस्सारण व्यवस्थेच्या अभावामुळे रस्ते जलमय झाले. बेतुरकर पाडा येथे घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. नगरसेवक उमेश बोरगावकर यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पत्रीपूल, शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल परिसर, कल्याण न्यायालय परिसर, कल्याण-शील रोड, शिळफाटा, एमआयडीसी तसेच टिटवाळ्यातील मधुवन सोसायटी, इंदिरा नगर आणि बाळ्याणी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शिळफाटा येथे एका कारला पाण्यावर तरंगताना पाहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


कल्याण पूर्वेतील चिंचपाडा-राहुलनगर येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर संसारोपयोगी साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. मोहिंदरसिंग-काबुलसिंग शाळा परिसरातील चाळींमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. तर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठ व दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

पावसाबरोबरच सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. डोंबिवली-खंबाळपाडा रोड येथे टाटा पॉवर स्थानकापासून एमआयडीसीपर्यंत चेंबर ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर सांडपाणी वाहू लागले. कल्याण पूर्वेतील न्यू गोविंदवाडी मार्गावर जलभराव झाला असून भूषण जिमसमोरील ड्रेनेजचे झाकण खचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सततच्या पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. जलभराव झालेल्या परिसरातील उघड्या वीज खांबांमधून करंट उतरत असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजनाकरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, केडीएमसी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि ड्रेनेज विभागाची पथके जलनिस्सारणासाठी कार्यरत असल्याचे सांगितले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि जलभराव झालेल्या भागात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Post a Comment

0 Comments