ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नेत्रा एंटरप्रायझेस आयोजित 'वी मुक्ता' (आम्ही मुक्ता) या उपक्रमांतर्गत कल्याण येथील मराठा मंदिर सभागृहात विविध टॅलेंट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व वयोगटातील महिलांनी गायन, नृत्य, अभिनय आदी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगतदार स्वरूप दिले.
कार्यक्रमाची संकल्पना महिलांना दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून काही क्षण स्वतःसाठी मिळावेत आणि त्यांच्या कला व प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आली होती. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

गायन स्पर्धेत अमृता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अभिनय स्पर्धेत हेमांगी जोशी यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने सर्वांची दाद मिळवत उत्कृष्ट कलाकार म्हणून वेगळी छाप पाडली.
नृत्य स्पर्धेतील ग्रुप डान्स प्रकारात फनी ग्रुपने प्रथम, तर माऊली ग्रुपने द्वितीय क्रमांक मिळवला. सोलो डान्स प्रकारात श्रेय गायकवाड यांनी प्रथम, आश्विनी शिरसाठ यांनी द्वितीय, दीपिका पाटील यांनी तृतीय, तर संगीता देसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. स्पर्धेचे परीक्षण संगीता थोरात यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबई येथील रिसर्च आयुर्वेद सेंटरच्या डॉ. श्रद्धा निकम यांचे मार्गदर्शन. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित महिलांना गुडघेदुखी, पाठदुखी, मणक्यांचे विकार, सांध्यांतील कडकपणा आणि चालण्यात येणाऱ्या अडचणी यांसारख्या समस्यांवर संशोधनाधारित, शस्त्रक्रियाविना आयुर्वेदिक उपचारांची माहिती दिली. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या शारीरिक समस्यांवर वेळेत उपचार आणि योग्य काळजी घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांनी दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची मिळालेली संधी आनंददायी असल्याची भावना व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत एकमेकींना शुभेच्छा देत त्यांनी निरोप घेतला.
महिलांच्या कला, आत्मविश्वास आणि आरोग्य जागरूकतेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम कल्याण शहरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.jpg)




Post a Comment
0 Comments