Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विद्यार्थी आंदोलना आधीच फडके मैदानात क्रिकेट सामन्यांना परवानगी

आंदोलन फडके मैदानातच करण्याची

आंदोलकांची भूमिका

                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणमध्ये शनिवारी होणाऱ्या आंदोलनावरून आता नवा वादंग निर्माण झाला असून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने कल्याण पश्चिमेतील फडके मैदान येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याठिकाणी क्रिकेट सामन्यांना परवानगी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र आमचे आंदोलन हे ठरल्याप्रमाणे फडके मैदानातच करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तर कॉंग्रेस पक्षाने देखील यात उडी घेतली असून, आंदोलकांना पाठींबा देत हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस पक्षरस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली.  आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाविषयी भाष्य करणे टाळले असले तरी फडके मैदानावर क्रिकेट सामने आयोजन करणारे भाजपशी संबंधित आहेत.

दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सीजेपीने विद्यार्थ्यांसह आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्च केला. या घनटेच्या निषेधार्थ सीजेपीच्या आंदोलनाने प्रेरित होऊन कल्याण-डोंबिवली परिसरातील विद्यार्थी शनिवारी २५ जुलै रोजी फडके मैदानावर आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने केले जाईल अशी माहिती दुर्वेश बोरगावकर यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकचे सुभाष मैदान, फडके मैदान, यशवंतराव चव्हाण मैदान मागितले होते. त्याचबरोबर पोलिसांकडून परवानगी मागितली होती. पोलिसांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली आहे. फडके मैदानात उद्या दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन केले जाणार आहे. मात्र महापालिकेने फडके मैदान सुधीर गायकर स्मृती क्रिकेट चषक सामान्यांना परवानगी दिली आहे. महापालिकेने त्यांना परवानगी का दिली ? या विषयी बोरगावकर यांनी भाष्य करणे टाळले आहे.

महापालिकेने क्रिकेट सामन्यांकरीता परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांचे आंदोलन फडके मैदानाच होणार आहे असे देखील बोरगावकर यांनी ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे भर पावसात मैदानातील चिखलात कोणी क्रिकेट खेळते का ? असा सवाल उपस्थित करीत बोरगावकर यांनी सांगितले की, कोणाला क्रिकेट अथवा काही ही खेळ खेळायाच असल्यास त्यांनी तो खेळावा. आम्ही आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कल्याण ते ठाणे, कल्याण ते शहापूरपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क साधला आहे. त्यामुळे या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सभागी होणार आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की, सीजेपी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्या आधी महापालिकेने क्रिकेट सामन्यांना परवानगी दिल्याने महापालिका प्रशासन सत्ताधारी पक्षाला हाती धरुन विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस त्या विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उरणार आहे.


Post a Comment

0 Comments