ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना पत्र दिले आहे.
कल्याण पश्चिम येथील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कल्याण शहरात, विशेषतः महिला व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काळा तलाव परिसर हा ऐतिहासिक वारसा असून, येथे दररोज हजारो नागरिक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. या परिसराच्या देखभालीची आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपवण्यात आलेली आहे.
परंतु, या कंत्राटदाराने सुरक्षेच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे आणि कमालीचा हलगर्जीपणा केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. तलाव परिसरात अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद असलेले किंवा नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आणि सुरक्षारक्षकांचा अभाव या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच अशा प्रकारच्या गंभीर घटनांना वाव मिळत आहे. कंत्राटदाराने वेळेवर सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच या तरुणीला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे.
या गंभीर बाबीचा विचार करता, सुरक्षेच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा अथवा योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा. या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा निष्पक्ष तपास करून दोषींचा तात्काळ शोध घेण्यात यावा आणि त्यांना कडक कायदेशीर शिक्षा व्हावी. तलाव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला किंवा संबंधित प्रशासनाला द्यावेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने या परिसरात रात्रीच्या वेळी तसेच पहाटे व संध्याकाळी गस्त वाढविण्याची मागणी कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments