Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संजय हंडोरे पाटील : छत्रपतींच्या विचाराने वाटचाल करणारे सर्वमान्य नेतृत्व

 

                      ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांचा वाढदिवस ५ जुलै रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा घेतलेला हा आढावा.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मौजे भादाणे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय हंडोरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवनाचे ध्येय मानत आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात केली. गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला असून तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

निडर आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व

संजय हंडोरे पाटील हे लहानपणापासूनच निडर आणि परोपकारी वृत्तीचे होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी गावाजवळील टेकडीचे भूस्खलन होऊन भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत तीन व्यक्ती दरडीखाली अडकल्या असताना त्यांनी धैर्य, प्रसंगावधान आणि साहस दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने तिघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.तसेच वयाच्या १६ व्या वर्षी गावातील एक व्यक्ती विहिरीत बुडाल्याची घटना घडली असता त्यांनी बेधडक विहिरीत उडी मारून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी वृत्तीची आजही गावात आठवण काढली जाते.

सामाजिक कार्य आणि सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी

संजय हंडोरे  पाटील यांनी साई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून जवळपास २० वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा यासाठी घरपट्टीवर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. गावातील मोकळ्या जागांवर सुमारे ३० हजार साग वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

गणेश जयंतीनिमित्त इको-फ्रेंडली मखर स्पर्धा, दीपावलीतील किल्ले सजावट, रांगोळी व आकाशकंदील स्पर्धा, शिवजन्मोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आनंद उत्सव, उन्हाळी कडधान्य उत्पादन स्पर्धा, तसेच मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या कार्यकाळात दरवर्षी सात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आणि एकही ग्रामसभा तहकूब झाली नाही. ग्रामसभेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामस्थांना संधी देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यात आली. गावात अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवातही त्यांच्या पुढाकारातून झाली.

‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ची राज्यभर दखल

दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांसह शाळेचे ध्वजारोहण करण्याचा अभिनव निर्णय भादाणे गावात त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा उपक्रम आज अनेक ठिकाणी राबविला जात आहे. सन २०२४ मध्ये लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या स्वागत व सत्काराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. याच कार्यक्रमात उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आशिष पटेल यांच्या हस्ते ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ उपक्रमाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

झुंजार आंदोलक आणि प्रभावी संघटक

२००९ मध्ये स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली होती.

कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. कला क्षेत्रातही ते सक्रिय असून वेस्टर्न इंडिया मोशन पिक्चर अँड टीव्ही प्रोड्युसर्स असोसिएशन (WIFPA)  संलग्न फ्रेंड्स फिल्म क्रिएशनचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

व्यायामशाळा उभारणीसाठी विशेष योगदान

ठाणे जिल्हा सार्वजनिक व्यायामशाळा संघाची स्थापना करून अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना शासनाकडून व्यायाम साहित्य व व्यायामशाळा इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

राजकीय क्षेत्रातील सहभाग

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक तसेच २०१२ मध्ये कोकण पदवीधर विधान परिषद निवडणूक लढविली. सर्वसामान्य तरुणांनाही राजकारणात संधी मिळू शकते, हा संदेश त्यांनी दिला.

राष्ट्रीय स्तरावरील कार्य

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून संजय पाटील यांनी राज्यभर संघटन विस्ताराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. १३२ वर्षांची परंपरा असलेल्या आणि छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी बहाल करणाऱ्या या ऐतिहासिक संघटनेच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

शिर्डी राष्ट्रीय अधिवेशन, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांमधील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मिर्झापूर, विजयवाडा, मेहसाणा, अयोध्या आणि जबलपूर येथे झालेल्या विविध राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले.

सन २०२६ मध्ये जबलपूर येथे राष्ट्रीय मंचावरून ‘कुर्मी जोडो अभियान’ची घोषणा करून त्यांनी समाज एकत्रीकरणाची चळवळ सुरू केली. शिवराज्याभिषेक दिनी रायगड जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात करून विविध उपजातींना जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

आज महाराष्ट्रात महिला महासभा, युवक महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा, मीडिया महासभा, साहित्य महासभा आणि कृषी महासभा यांसारख्या विविध संघटनात्मक विंग्स राज्यभर कार्यरत आहेत.सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि जनसंपर्काच्या बळावर संजय पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून पुढील काळातही त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे, ह्याच शुभेच्छा..

(शब्दांकन : 

संपादक : जयेश शेलार पाटील...मो. ७६२०२५६७५०

महासचिव – अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश

Post a Comment

0 Comments