ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त गुरुवारी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात "सुसंगती सदा घडो" या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत कल्याण परिमंडळ-३ पोलीस आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला अपर पोलीस आयुक्त संजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, सुहास हेमाडे तसेच केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. परिमंडळ-३ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारीही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे नुकसान करणारे असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ. दीपा शुक्ला यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीतील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांसह सुमारे ७०० ते ८०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवून योग्य दिशा देणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
.jpg)

Post a Comment
0 Comments