ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांच्या आदेशाने गुरुवारी खडवली व राया गावातील राया-खडवली रस्त्यावरील अनाधिकृत वाणिज्य आस्थापना निष्कषणाची कारवाई करण्यात आली.
मागील एक वर्षापासून कल्याण तालुक्यात असणाऱ्या शासकीय व खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकाम यांच्यावर तोडक कारवाई तहसीलदार कार्यालयामार्फत वेळोवेळी आयोजित करण्यात येत आहे.
खडवली व राया या गावातील अनधिकृत बांधकामाना तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन नायब तहसीलदार, ३ मंडळ अधिकारी व तालुक्यातील सर्व तलाठी यांचे पथक नेमण्यात आले होते तर या सोबत १२५ पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचारी,ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी,अग्निशामक दल,वैद्यकीय पथक इतकी यंत्रणा कार्यान्वित होती.
या कारवाई दरम्यान एकूण ८५ वाणिज्य आस्थापना जमीनदोस्त करण्यात आल्या. सुमारे २५ आस्थापनांना उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश प्राप्त होता त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. या आस्थापनांच्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने तहसीलदार यांना दिले असल्याने त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. महसूल विभागाच्या या कारवाईने तालुक्यात होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर निश्चित आळा बसेल. नागरिकांनी रीतसर परवानग्या घेऊन बांधकाम करण्याचे आवाहन तहसीलदार विकास गारूडकर यांनी केले आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments