शिवसेना ठाकरे गट, मनसे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व परिसरात वाढत्या महिला अत्याचार, छेडछाड, लैंगिक गुन्हे, अमली पदार्थांचा वाढता वापर तसेच इतर गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट तसेच इतर पक्षांच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील, शहरप्रमुख हेमंत चौधरी, युवसेना शहर अधिकारी ॲड. नीरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, मनसेचे कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, अंकुश राजपूत, गणपत घुगे, आझम शेख, आदी विरोधी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कल्याण पूर्व भागात अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून देणे, नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करणे, बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, महिला सुरक्षेसाठी विशेष गस्त पथके वाढविणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भातील विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी महिला व बालिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कल्याण पूर्व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी सांगितले. महिला मुलींवर अत्याचार करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी तसेच कल्याण पूर्वेत पोलीस बळ वाढविण्याची मागणी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली. तर कल्याण पूर्वेतील सर्व पोलीस चौक्या या बंद असून या बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरु करा आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केली.
दरम्यान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
.jpg)


Post a Comment
0 Comments