ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर, उल्हासनगर, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर या पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची वैधानिक सभा प्रथमताच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केडीएमसी आयुक्त तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस प्रामुख्याने केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, भिवंडी महापौर नारायण चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, अंबरनाथ नगराध्यक्ष तेजश्री करंजुले, बदलापूर नगराध्यक्षा रुचिता घोरपडे हे नवनियुक्त संचालक उपस्थित होते. तसेच भिवंडी आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाळे, अंबरनाथ मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, केडीएमसी परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे हे संचालक उपस्थित होते. याशिवाय सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उपायुक्त, शहर अभियंता समन्वय अधिकारी व संबंधित विषयाचे कामकाज पाहणारे व्यवस्थापकीय वाहतूक अधिकारी, उप अभियंता (यांत्रिकी), आगार व्यवस्थापक व इतर संबंधित कर्मचारी देखील उपस्थित होते.
डॉ. विजयकुमार द्वासे, यांनी या महामंडळाचे सचिव म्हणून प्रथमतः केएमपीएमएल बाबत सविस्तर सादरीकरण केले आणि भविष्यात करावयाच्या एकंदरित वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी पुढील काळात करावयाच्या अल्प व दिर्घकालीन उपाययोजनांची माहिती देऊन या कार्यक्षेत्रात निर्माण होणा-या अभूतपूर्व सार्वजनिक परिवहन सेवेचे साक्षीदार म्हणून सर्व संचालकांना जबाबदारीबाबत सुध्दा अवगत केले. तद्नंतर बैठकीस सुरुवात करणेत आली आणि विविध विषयांच्या प्रस्तावांचे सादरीकरण केले.
या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, यामध्ये कल्याण महानगर परिवहन महामंडळामार्फत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हि बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली असून या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर साधक-बाधक चर्चा होऊन सार्वजनिक परिवहन सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाच्या पीएमई योजने अंतर्गत चालकांसह नव्याने येणाऱ्या तीनशे बसेस पैकी १०० बसेसचा पहिला ताफा साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत दाखल होणार असून त्यासाठी आवश्यक त्या बाबींचे पूर्व नियोजन करण्याचे दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments