ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा भार कमी व्हावा, या उद्देशाने डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघात १० लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वह्यांचे वितरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक १४ च्या विद्यमान नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. सारिका सतीश जाधव यांनी आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाला परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होत आहे. वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत.
यावेळी बोलताना सारिका जाधव यांनी सांगितले की, "खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी मदत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. वह्यांचे मोफत वाटप केल्यामुळे अनेक कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होईल."
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजातील वंचित आणि मागास घटकांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविण्यासाठी शिवसेना सातत्याने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत असते. भविष्यातही अशा लोकाभिमुख योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.
या उपक्रमामुळे शिक्षणासाठी झटणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवीन उभारी मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
.jpg)



Post a Comment
0 Comments