वालधुनी उन्नत मार्गावरील वादामुळे विकासकामाला ब्रेक..?
कल्याणच्या वाहतूक नियोजनासमोर नवे आव्हान
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम भागाला अधिक वेगवान व सुलभ जोडणी देण्यासाठी वालधुनी नदीलगत उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पास सध्या वादाचे ग्रहण लागले आहे. वालधुनी येथील बौद्धभूमी फाउंडेशनच्या परिसराशी संबंधित प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या काही आठवड्यांपासून प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत असून, हा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर केवळ प्रकल्पच नव्हे तर संपूर्ण शहराच्या वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रेम ऑटो सर्कल ते विठ्ठलवाडी दरम्यान उभारण्यात येणारा हा उन्नत मार्ग कल्याण शहराच्या वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाची जोडणी थेट कल्याण-अहिल्यानगर राज्य महामार्गाशी होणार असल्याने पूर्व-पश्चिम भागांमधील संपर्क अधिक वेगवान होणार आहे. सध्या कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच परिसरातील लाखो वाहनचालकांना शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील ताणही कमी होईल.
विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे वालधुनी रेल्वे उड्डाणपूल, शहाड रेल्वे उड्डाणपूल तसेच एफ-कॅबिन परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. उल्हासनगर व अंबरनाथकडून येणारी वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागात न शिरता पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार असल्याने शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळू शकतो.
मात्र दुसरीकडे, वालधुनी येथील बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेशी संबंधित प्रश्नामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे. या परिसरातील काही बांधकामे व धार्मिक-सामाजिक संरचनांवर कारवाई झाल्यानंतर स्थानिक बौद्ध समाज, भिक्षू आणि विविध संघटनांकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. परिणामी प्रकल्पाच्या कामाच्या गतीवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने हा वाद कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वालधुनी येथील बौद्धभूमीचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाबोधी संकुलाच्या धर्तीवर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याठिकाणी बौद्ध विहार, ध्यान केंद्र, ग्रंथालय, संशोधन केंद्र आणि सांस्कृतिक सुविधांचा समावेश असलेले मोठे केंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे वाद मिटविण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये एकमत होणे आवश्यक ठरणार आहे.
शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही मोठ्या पायाभूत प्रकल्पामध्ये जमीन संपादन, स्थानिक भावना आणि सामाजिक प्रश्न यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असते. हा वाद लांबल्यास प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच काम पूर्ण होण्यास विलंब झाल्यास शहरवासीयांना अपेक्षित वाहतूक सुलभतेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. आधीच वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनसंख्येमुळे कल्याणमधील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पातील प्रत्येक विलंबाचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर होणार आहे.
एकीकडे धार्मिक व सामाजिक भावना जपण्याची गरज आहे, तर दुसरीकडे शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि बौद्धभूमीशी संबंधित घटक यांनी संवादाच्या माध्यमातून तोडगा काढल्यासच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागेल आणि कल्याणच्या विकासाला अपेक्षित गती मिळू शकेल.
बुद्धभूमी प्रकरणावरून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आंदोलन
पोलिस प्रशासन व खासदारांवर गंभीर आरोप
वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरील कारवाईच्या निषेधार्थ बौद्ध बांधव आणि भिक्खूसंघ सदस्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरु करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाथेरो गौतम रत्न यांनी पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले.
महाथेरो गौतम रत्न यांनी सांगितले की, ३० मे रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या आश्रयस्थान धम्म केंद्र परिसरात असलेल्या बुद्धमूर्तींची विटंबना करण्यात आली तसेच परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली. बुद्धमूर्तींचे कोणत्याही धार्मिक विधीशिवाय निष्कासन करण्यात आले असून त्यानंतर पवित्र धम्मस्थळातील विविध बौद्ध वास्तू आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण कारवाईमागे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकाला उड्डाणपूल बांधकामाचे कंत्राट मिळाल्यामुळे आर्थिक फायद्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशनची जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गौतम रत्न यांनी म्हटले. तसेच या प्रक्रियेला स्थानिक पोलिस प्रशासनाचेही समर्थन मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बुद्धमूर्तींच्या कथित विटंबनेमुळे देशभरातील बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संपूर्ण बौद्ध समाजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला. या निषेधार्थ संविधानिक आणि लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकरणी आवाज उठवला जात असून संबंधित विभाग आणि पोलिस प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी दडपशाही, दंडुकेशाही आणि हुकूमशाही पद्धतीचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत, आंदोलकांनी न्याय्य तोडगा काढण्याची मागणी केली. यापूर्वी झालेल्या बैठकींमध्ये कोणताही ठोस निर्णय निघाला नसून केवळ आश्वासनांची पूर्तता केली जात असल्याचे महाथेरो गौतम रत्न यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष आणि सकल बौद्ध समाजाच्या वतीने बुद्धभूमी फाउंडेशनच्या विकासविरोधी भूमिकेविरोधात ही धरणे आंदोलन.
बुद्धभूमी व कल्याण शहराचा विकास या मागणीसाठी सकल बौद्ध समाज कल्याण शहराच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. या आंदोलनात रिपाईचे जेष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, राम बनसोडे, भारत सोनावणे आदींसह इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
बोधगया च्या धर्तीवरील महाबोधी बुद्धविहाराची प्रतिकृती नुसार सुसज्ज बुद्धविहार, विपश्यना केंद्र, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने 50 मीटर उंचीची भव्य बुद्धमूर्ती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्मारक, उड्डाण पुलाला बुद्ध भूमी नामकरण, रुग्णालय, शाळा व वसतिगृह बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बुद्धभूमी व कल्याण शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्या समाज कटकांवर पोलीस कारवाई करावी. अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
.jpg)






Post a Comment
0 Comments