Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

फेरीवाल्यांवरून कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं

 

फेरीवाले हटवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करावे लागणे दुर्दैवी – अमित म्हात्रे

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण, प्रतिनिधी 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील फेरीवाला प्रश्न पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला असून, या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधारी पक्ष आणि केडीएमसी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फेरीवाले हटवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असल्याने शहरातील प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश उघड झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे यांनी केला आहे.

डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अमित म्हात्रे यांनी फेरीवाला प्रश्नावरून महापौर हर्षाली थविल यांच्यावरही निशाणा साधला. काही काळापूर्वी महापौर फेरीवाल्यांकडून खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.

शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे व्यापली गेली असून नागरिकांना वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यात केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

अमित म्हात्रे म्हणाले की, “ज्या पक्षाकडे महानगरपालिकेची सत्ता आहे, त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फेरीवाले हटवण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर हा कारभाराचा पराभव आहे. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात आणि शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यात सत्ताधारी पूर्णपणे निष्फळ ठरले आहेत.”

महापौर हर्षाली थविल यांचा फेरीवाल्यांकडून खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्येही विविध चर्चा रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या मते, फेरीवाला प्रश्न हा केवळ अतिक्रमणाचा विषय नसून तो शहर नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे केवळ आंदोलने करून किंवा राजकीय भूमिका घेऊन हा प्रश्न सुटणार नसून प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

दरम्यान, काँग्रेसने फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेऊन नागरिक, व्यापारी संघटना आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत योग्य धोरण आखण्याची मागणी केली आहे. येत्या काळात हा मुद्दा आणखी तीव्र करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.

फेरीवाला प्रश्नावरून सुरू झालेल्या या राजकीय संघर्षामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments