" नेट झिरोचे ध्येय गाठण्यासाठी सौर ऊर्जेची क्रांती गरजेची" .....महावितरणचे अधिकारी अमोल चौधरी
ठाकुर्लीत 'Kelite Solutions' या सौर ऊर्जा क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन महावितरणचे अधिकारी अमोल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
"वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि ऊर्जेची गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जा हा आता केवळ एक पर्याय नसून आपल्या ऊर्जा स्रोतांचा एक अविभाज्य भाग बनला आहे," असे प्रतिपादन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल चौधरी यांनी केले. ठाकुर्ली येथील नामांकित 'केलाईट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' (Kelite Solutions Pvt Ltd) या सौर ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेच्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयाच्या भव्य उद्घाटन प्रसंगी ते मुख्य अतिथी आणि उद्घाटक म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात श्री. अमोल चौधरी यांनी 'नेट झिरो' (Net Zero carbon emission) या जागतिक मोहिमेवर विशेष प्रकाश टाकला. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी सौर ऊर्जा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक छतावर लागणारे सोलर पॅनेल हे प्रदूषणमुक्त आणि शाश्वत भविष्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने महावितरण आणि सर्वसामान्य ग्राहक दोघांनाही मोठे फायदे होत असल्याचे सांगताना त्यांनी नेट मीटरिंग' द्वारे वीज बिलात मोठी बचत होईल, ग्रीडवरील ताण कमी होणार तसेच शाश्वत आणि अखंडित वीज पुरवठा उन्हाळ्यातही मिळणार या मुद्द्यावर भर दिला.
या उद्घाटन प्रसंगी 'Kelite Solutions' चे संचालक सायली पाटील व गौरव पाटील, स्थानिक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ठाकुर्ली आणि कल्याण परिसरातील नागरिकांना आता एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या सौर ऊर्जा सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments