घोड्यावर बसून कल्याणमध्ये कॉंग्रेसचे
मेलोडी चॉकलेट वाटप...
इंधनदरवाढ आणि वाढत्या महागाईचा केला
निषेध
इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणात काँग्रेसचे अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसरात काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनदरवाढ आणि त्यामुळे होत असलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशन परिसरात निषेध आंदोलन करत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान याच घोड्यावर बसून कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालय गाठत, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कल्याण तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मागील ११ दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ६ रुपयांची वाढ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी या दरवाढीमुळे अधिक वाढल्या असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या निवेदनात गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किंमतींमध्ये ३८ टक्के तर डिझेलच्या किंमतींमध्ये ६२ टक्क्यांची वाढ झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते, तरीदेखील पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले होते, असा दावा करण्यात आला.
तसेच केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर व उत्पादन शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवला असून, अलीकडील दरवाढीमुळे तेल कंपन्यांनी मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत असून, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होत असल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेल्या डिझेलच्या कमतरतेमुळे शेतीची कामे खोळंबत असून, याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होऊन महागाई आणखी वाढू शकते, असा इशाराही काँग्रेसने दिला.
सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा तसेच इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी कल्याण जिल्हा काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.ह्या प्रसंगी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments