ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी प्रकरण आहे कर आकारणी आणि महापालिका रेकॉर्डमधील विसंगतीचे. कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरातील गुजराती मंदिराजवळ शेख कुटुंबाचे घर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या घराचा महापालिका कर शेख कुटुंबाकडून नियमित भरला जात होता. मात्र काही वर्षांनंतर कर भरण्यासाठी महापालिका कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली की, हे घर तर 2008 मध्येच तोडण्यात आल्याची नोंद रेकॉर्डमध्ये आहे.
याबाबत शेख कुटुंबाचा सवाल आहे की, जर घर 2008 मध्येच तोडण्यात आले होते, तर त्यानंतर तब्बल 15 वर्षे महापालिकेने या घराचा कर कसा स्वीकारला? अस्तित्वात नसलेल्या घराचा कर घेतला गेला का? आणि आज घरमालक स्वतःहून कर भरण्यासाठी आला असताना अचानक घर अस्तित्वात नसल्याचे का दाखवले जात आहे? रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईदरम्यान 2008 मध्ये हे घर हटवण्यात आल्याची नोंद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात घर अस्तित्वात असून कुटुंब तिथे राहत असल्याचा दावा शेख कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितले, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अखेर त्यांनी उमेश बोरगावकर यांची भेट घेतली असून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये आणि प्रत्यक्ष परिस्थितीत इतका मोठा फरक कसा निर्माण झाला? कर आकारणी विभागाच्या कामकाजावर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments