अनधिकृत बंगल्यावर कारवाई होत नसल्याने महिलेचे उपोषण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर गेल्या सात दिवसांपासून ज्योती म्हात्रे या महिला आमरण उपोषणाला बसल्या असून, आपल्या पागडी पद्धतीवरील घराचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला गेला नाही. तसेच संबंधित जागेवर अनधिकृत बंगला उभारण्यात आला आहे. या अनधिकृत बंगल्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ज्योती म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात ज्या ठिकाणी त्यांचे पागडी पद्धतीवरील घर होते ते घर पाडण्यात आले. घरावर जेव्हा कारवाई केली गेली होती संबंधित व्यक्तीने त्यांना मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिलं होतं. मात्र आतापर्यंत ज्योती म्हात्रे यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई अथवा पर्यायी व्यवस्था देण्यात आलेली नाही. त्याच जागेवर सध्या बंगला उभारण्यात आला असून त्या अनधिकृत बंगल्यावर केडीएमसीकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या मागण्यांसाठी त्या गेल्या सात दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर आमरण उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित बंगला अनधिकृत असल्याचे मान्य करण्यात आले. मात्र तो खाजगी जागेवर बांधण्यात आला असल्याने तात्काळ कारवाई करण्यात आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच संबंधित बंगला मालकाने बांधकाम नियमित करण्यासाठी केडीएमसीकडे अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या कारवाई स्थगित ठेवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
एकीकडे आपल्याला न्याय आणि मोबदला मिळत नसल्याची तक्रार ज्योती म्हात्रे करत असताना, दुसरीकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments