ब्लॅक अँड व्हाईट (विशेष लेख)
"पक्षाच्या सभेची तयारी मी करेल पण मी वक्ता असणार नाही."
"जाहीर सभेची बातमी मी करेल पण बातमी माझ्या नांवावर असणार नाही."
"निवडणुकी साठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल पण मी उमेदवार असणार नाही"
"पक्षा साठी मी झिजेन पण मी श्रेय घेणार नाही"
"प्रत्येक कार्य होणारच पण त्यात मी पणाचा अहंकार नसेल" महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात जवळ पास चाळीस वर्ष काम करणाऱ्या जनसंघ- भाजपा संघटन मंत्री असलेल्या वसंतराव भागवत यांची उपरोक्त प्रमाणे कामाची ही पद्धती होती.आज जरी हे कोणालाही खर वाटणार नाही.परंतू वसंतराव भागवत यांच्या जीवनाची हिच कार्यपद्धती होती.वसंतराव भागवत यांच्या कार्यपद्धतीच्या ज्या आठवणी स्व.प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंढे, प्रा.राम कापसे, रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ नाईक आणि रावसाहेब दानवे,माधव भंडारी यांनी लिहून ठेवल्या आहेत त्या उपरोक्त आठवणी प्रमाणेच कामाची पद्धत लक्षात येते.महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात अनेक नेते सत्ता, वारसाने मिळालेली राजकीय पदे किंवा लोकप्रियतेमुळे ओळखले जातात.मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की जी पडद्यामागे राहून इतिहास घडवत असतात.स्व.वसंतराव भागवत हे अशाच निःस्पृह व अफाट जनसंपर्क असलेल्या व्यक्तिमत्त्वा पैकी एक राजकीय व्यक्तिमत होते. वसंतराव भागवत महाराष्ट्रात जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र संघटन मंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्रात भाजपाच्या संघटनात्मक पाया भरणीत तथा पक्षाला पक्षाला स्थायी स्वरूप देण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले होते.वसंतराव भागवत यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारे मधून झालेला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील शिस्त,अनुशासन, राष्ट्रभावना, सेवाभाव आणि दीर्घकालीन संघटनेचा दृष्टिकोन हे गुण त्यांच्या राजकीय कार्याचे अधिष्ठान होते.तसेच त्यांनी राजकीय क्षेत्रात एखाद्या तपस्वी ऋषी प्रमाणे कार्य करीत राजकीय क्षेत्राला सत्तेचे साधन न मानता समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणूनच निःस्वार्थ कार्य केलेले आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणा मधील आदर्श मानले जाते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते जनसंघ भाजपा संघटन मंत्री असा त्यांचा प्रवास सामान्य कार्यकर्त्याना सतत प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच त्यांच्या पावन स्मृती स्मरणार्थ हा अल्प लेख आहे. अंत्योदयचा जिव्हाळा वसंतराव भागवत यांचा जन्म दि ८ मे १९३३ रोजी कोंढाळा ता.चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता.शिक्षण पुणे येथे झाले.वसंतराव भागवत पुणे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या भागात त्यांच्या आत्याबाई कडे राहायचे आणि त्या भागातील संघ शाखेत जात असत.हळूहळू त्या शाखेचे मुख्य व कार्यवाहाच त्यांनी दायित्व निर्वाहन केले होते.रेल्वे स्टेशनजवळ राहत असल्याने पुणे शहरांत येणाऱ्या संघ अधिकारी यांना कार्यालयात आणणे किँवा कार्यालय मधुन रेल्वे स्टेशनवर पोहचविणे, त्यांना सतत भेटणं असा त्यांचा क्रम सुरू असताना संघाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गा सोबत त्यांचा संपर्क दृढ होत होता.तसेच रेल्वे स्टेशन जवळच त्यांची शाखा असल्याने शाखेत रेल्वे हमालाच्या परिवारातील मुलांचा सहभाग असायचा त्यांचे दैनदिन जीवन वसंतराव भागवत यांनी जवळून पाहिले होते त्यामुळेच पुढें अंत्योदय हा विषय त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग तथा जिव्हाळयाचा विषय ठरला होता.तत्कालीन पुण्यातील संघाचे प्रचारक रामभाऊ गोडबोले यांच्या सोबत दृढ संपर्क होता त्यामुळे त्यांचाच प्रेरणे मधुन वसंतराव भागवत यांनी १९६० साली प्रचारक जिवन स्वीकारले आणि पुढे अंतिम क्षणा पर्यंत पांढऱ्या कपड्यातील आधुनिक ऋषी प्रमाणे व्रतस्थ जीवन जगले. संघाचे प्रचारक ते संघटन मंत्री वसंतराव भागवत अत्यंत गोरेपाण,देखण व्यक्तिमत्व होते आणि ते नेहमी टापटीप,नीटनेटके रहायचे कधीच त्यांचे कपडे विस्कळले नसायचे.सोलापुरच्या व्याख्यान मालेत प्रा.राम कापसे यांनी त्यांच्या आठवणी सांगताना त्यांना मिस्टर टिनोपाल म्हणत असल्याचा उल्लेख केला होता.वसंतराव भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना पहिल्यांदा विस्तारक म्हणून गेले होते.संघ कार्यपद्धती मध्ये ठराविक अल्प काळा साठी पूर्ण वेळ संघ कार्य करण्यास विस्तारक म्हणतात.वसंतराव भागवत कोपरगांवला विस्तारक म्हणून गेल्यावर त्यांची भेट सूर्यभानजी वहाडणे यांच्या सोबत झाली व कायमचे ऋणानुबंध निर्माण झाले आणि शेवट पर्यंत होते.पुण्यातील संघाचे प्रचारक रामभाऊ गोडबोले यांच्या सततच्या संपर्क मुळे वसंतराव भागवत वर्ष १९६० मध्ये संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले.कालांतराने त्यांच्या कडे भारतीय जनसंघाच्या कामाची जबाबदारी आली होती. त्या काळात देशात काँग्रेसचा एक छत्री अंमल असताना जनसंघाच काम उभे करणे अत्यंत कठीण होते.परंतू त्या कठीण काळात त्यांनी संघटनेच्या संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिले.संघटनेचा विस्तार,कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण,वैचारिक बैठक पक्की करणे,कार्यकर्ता निर्माण इत्यादि रचनात्मक कामे त्यांनी केली होती.१९८०मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर त्यांना संघटन मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली.संघटन मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर पक्षाची शिस्तबद्ध व स्थायी रचना उभारण्याचे कठीण कार्य केले.स्व.प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंढे,ना.स.फरांदे,अण्णा डांगे,भाऊसाहेब लहाने,पांडुरंग फुंडकर अशी देश व महाराष्ट्र व्यापी नेत्यांची फळी उभी केली होती.
सोशल इंजिनिअरिंग मा-ध-व प्रयोग वसंतराव भागवत महाराष्ट्र भाजपा संघटन मंत्री म्हणून कार्य करीत असतांना महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रबळ वर्चस्व होते. सोबतच साखर सम्राट,सहकार क्षेत्रातील दिग्गज तथा शिक्षण क्षेत्रातील मोठ्या हस्तीचा मोठा प्रभाव होता.अशा परिस्थितीत भाजपाचा विस्तार करणे हे सोपे काम नव्हते.मात्र वसंतराव भागवत यांनी दीर्घकालीन स्थायी संघटन बांधणीवर भर दिला.त्यासाठी त्यांनी सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात केला होता.मायावती यांनी उत्तर प्रदेशात आणि प्रकाश आंबेडकरांनी ग्रामीण भागात जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे.तो प्रयोग वसंतराव भागवत यांनी मायावती व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व उदय होण्या अगोदर म्हणजे सात दशका पूर्वीच केला होता.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात बहुजनस समाज,बारा बलुतेदार यांची मोट बांधून सोशल इंजिनिअरिंग मा-ध-व फॉर्म्युला विकसित केला.ठरावीक पद्धतीने संघटनेचा विस्तार करण्यासाठी नियमबद्ध रचना उभी केली जिल्हा,तालुका,ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यामुळेच भाजपाची मुळे समाजात खोलवर रुजली आणि नंतरच्या काळात पक्षाला सत्ता मिळवण्याचा मजबूत पाया तयार झाला. त्या क्षणिक निवडणुका मध्ये विजय प्राप्त करण्या ऐवजी संघटन बांधणीला त्यांनी महत्त्व दिलं होतं त्यामुळेच त्यांच्या हयातीतच.महाराष्ट्रात१९७८च्या पुलोद प्रयोग पासून १९८९ साली खासदार संख्या व १९९०मध्ये भाजपा आमदाराची लक्षणीय संख्या वाढून विधान सभेत यश प्राप्त करता आले होते.आज तर सर्वच सर्व क्षेत्रात भाजपा यश संपादन करीत असुन त्यामागे वसंतराव भागवत सारख्या अनेक पांढऱ्या कपड्यातील आधुनिक ऋषीची तपश्चर्या महत्वाची आहे. निर्मोही वसंतराव भागवत
निर्मोही असलेल्या वसंतराव भागवत यांनी कधिच व्यक्तिकेंद्रीत राजकारण केले नव्हते.आमदार,खासदार होण्याचा मोह सुद्धा केला नाही.सत्ता आणि प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी संघटन सांगेल ते कार्य करून व्यक्त निर्माण,कार्यकर्ते घडवण्याला प्राधान्य दिले होते. त्यांच्या काळात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्य व्यापी आणि देशव्यापी कार्यकर्ते तयार झाले होते आणि त्यांनी राज्य आणि देश पातळीवर नेतृत्व सुद्धा केले आहे.म्हणूनच त्यांना“पडद्यामागील शिल्पकार”असे म्हटले जाते. ज्वलंत राष्ट्रवाद,सांस्कृतिक मूल्ये,संघशिस्त आणि संघटनात्मक विचारधारा,निष्ठा या तत्त्वांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. सततचा प्रवास,दगदग आणि कठोर परिश्रम इत्यादी मुळे त्यांचे शरीर थकले त्यांना विविध आजाराने सुद्धा ग्रासले होते.अखेर च्या क्षणी स्व प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी त्यांची शुश्रूषा केली होती.काळजी घेतली होती शेवटी दिनांक २१ फेब्रुवारी १९९० रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी उभी केलेली संघटने ची संघटनात्मक परंपरा आजही जिवंत आहे.स्व. वसंतराव भागवत हे राजकारणातील असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी स्वतः साठी सत्ता, पद मिळविण्याचा कधीच विचार केला नाही,परंतू संघटने साठी कठीण परिश्रम करत राजकीय सत्तेचा मजबूत मार्ग तयार करून दिला आहे.त्यामुळेच भाजपा आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्व.वसंतराव भागवत यांच नाव कायम स्मरणात राहील.
(लेखक भाजपा,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत)
.jpg)

Post a Comment
0 Comments