26 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा, युनिट 3, कल्याण यांच्याकडून
पुढील तपास सुरू
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणमध्ये गुन्हे शाखा युनिट 3 ने मोठी कारवाई करत एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 26 लाख 63 हजार 509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोसेक वेलनेस प्रा. लि. कंपनीने तयार केलेल्या व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही काही जण त्या पॅकेट्स व डब्यांवर बनावट नवीन एक्सपायरी डेटचे लेबल लावून बाजारात विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे 14 मे रोजी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ परिसरातील मिनी बाजार, शॉप क्रमांक 68, जवेदा लॉज, जुना मच्छीबाजार येथे छापा टाकण्यात आला. येथे आरोपी अब्दुलकरीम रईस खान (वय 40) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेले व्हिटामिनयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
तपासात समोर आले की आरोपी हा माल भिवंडी येथील बिबल रामदुलार यादव (वय 43) याच्याकडून खरेदी करून आपल्या मिनी बाजार दुकानात विक्री करत होता. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथील गोदामावरही छापा टाकून एकूण 26 लाख 63 हजार 509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपल्याची पूर्ण जाणीव होती आणि हे पदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, हे माहिती असूनही ते जुने लेबल काढून त्यावर नवीन तारखेचे बनावट लेबल लावून विक्री करत होते. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये लिटर जॉयस मिलेट चोको क्रंच, ग्लूटेन फ्री पास्ता, पीनट बटर आणि चॉकलेट हेजलनट स्प्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments