Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास लवकरच होणार


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेतील घोलपनगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या 13 इमारती अती धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर सदर सोसायटीच्या काही सदस्यांकडून ह्या कारवाई संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.तसेच प्रसार माध्यमातून ह्या विषयी काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या.त्याच अनुषंगाने सोसायटीच्या कमिटी कडून खुलासा करण्यात आला.त्यात कमिटी सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की,कल्याण डोंबिवली महापालिकेने 30 वर्ष जुन्या झालेल्या आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या ह्या 13 पैकी 12 इमारतींचे  स्टकचरल ऑडिट करून त्या इमारती अतिधोकादायक असल्याचा निर्वाळा दिला होता.एक इमारत ही नुकतीच पुनर्विकास प्रक्रिये द्वारे सुस्थितीत असल्याने,त्या इमारती संदर्भात पुनर्विकास करण्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या.परंतु सोसायटीच्या सदर इमारतीतील बहुतांश रहिवाशांच्या आग्रहाने आणि पदाधिकाऱ्यांकडून सर्वानुमते विकासकाला सर्वच इमारतींच्या पुनर्विकासासाठी नेमण्यात  आले.

सोसायटीतील बहुतांश रहिवाशांनी (90 टक्के) सदर पुनर्विकासाला आपला पाठिंबा दर्शविला.रहिवाशांनी आपल्या सर्व सोयी सुविधांसंदर्भात मागण्या विकासाकडून लेखी घेऊन कमिटीच्या सदस्यांना ह्या पुनर्विकासाला मंजुरी दिली असल्याचे सांगण्यात आले.

ज्या सदस्यांकडून  ह्या पुनर्विकास प्रक्रियेला विरोध केला जात आहे,त्यांच्याही शंका कुशंकाचे निरसन करून हा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा या साठी प्रयत्नशील आहोत असेही कमिटी सदस्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे जीर्ण वास्तूंमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरकडून मानसिक छळ आणि दबाव असल्याचा गंभीर आरोप काही मोजक्या रहिवाशांकडून करण्यात आला असल्याने पुनर्विकास प्रकल्प अधांतरी राहिला आहे.

 पुनर्विकास प्रक्रिये संदर्भात काही  रहिवाशांना संपूर्ण माहिती न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय घाईघाईने निर्णय घेतला जात असल्याचा आरोप  विरोध करणाऱ्या रहिवाशांकडून होत आहे. या संदर्भात कमिटी सदस्यांनी स्पष्ट केले की पुनर्विकास योजना ही सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.सर्व सदस्यांना योग्य तो न्याय हक्क मिळणार आहे.विकासकाकडून कोणत्याही प्रकारे दबाव किंवा जबरदस्ती केली जात नाही हे स्पष्ट करीत कमिटीने, काही सदस्यांना काही बाबतीत आक्षेप असतील तर त्या नाराज सदस्यांची समजूत काढून हा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा, जेणे करून सर्वांना योग्यवेळी योग्य सोयी सुविधांनी युक्त असे आपले हक्काचे घर मिळावे असा आमचा प्रयत्न आहे.या साठी स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य मिळत आहे ,अशी माहिती कमिटी कडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments