ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन ओक हायस्कूलमध्ये गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्य व लेखन कौशल्याचा विकास व्हावा व त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून 'प्रत्यक्ष निसर्गचित्रण','चेहरा रेखाटन', 'शिल्पकला' व क्षेत्रभेटीवर आधारित 'वृत्तांत लेखन' हे उपक्रम राबविण्यात आले.असे सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री.कैलास सरोदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. 'निसर्गचित्रण' हा उपक्रम इ.८वी.ते १०वीसाठी घेण्यात आला. सदर उपक्रम प्रत्यक्ष दुर्गाडी किल्ला व खाडी परिसरात विद्यार्थ्यांना नेऊन घेण्यात आला. 'शिल्पकला उपक्रम' हा इ.५वी,ते ८वी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना विषयाचे बंधन नव्हते; हा उपक्रम मुक्त शिल्पकलाविष्कार-"शिल्प माझ्या मनातलं...!" या शीर्षकाखाली घेण्यात आला तर इ.८वीसाठी 'प्रत्यक्ष चेहरा रेखाटन' हा उपक्रम बुलेटिन तासिकांना घेण्यात आला. यामध्ये स्वतः श्री. कैलास सरोदे सरांनी विद्यार्थ्यांच्या समोर बसून विद्यार्थ्यांकडून स्वतःचा प्रत्यक्ष चेहरा रेखाटन करून घेतला.तसेच शाळेची इ.९वीच्या विद्यार्थ्यांची 'मर्चंट नेव्ही', उरण येथे जाऊन आलेल्या क्षेत्रभेटीवर आधारित 'वृत्तांतलेखन स्पर्धा' घेण्यात आली.
या उपक्रमांना स्पर्धेचं स्वरूप देण्यात आलं आणि बक्षीसपात्र २९ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात आली. हे उपक्रम व स्पर्धा शाळेतील सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. कैलास यादव सरोदे यांच्या संकल्पनेतून व सौजन्याने घेण्यात आले.दि.३०मार्च २०२६रोजी या स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. या बक्षीस समारंभासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपकार्याध्यक्ष व शालेय समितीचे अध्यक्ष श्री. रमेश पुंडलिक गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणातील अग्रवाल कॉलेजचे चेअरमन श्री. विजयनारायण आर. पंडित उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय करून देताना ज्येष्ठ शिक्षक श्री. उत्तम गायकवाड सर यांनी श्री.विजयनारायण पंडित यांचे विविध पैलू उलगडून दाखविले तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री. रमेश गोरे यांचे शाळेला सतत सहकार्य व आम्हा शिक्षकांना नेहमीच चांगले मार्गदर्शन मिळत असते, असे सांगितले. मुख्याध्यापक श्री. दिलीप सलाबत तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. विजयनारायण पंडित व श्री.रमेश पुंडलिक गोरे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी श्री.कैलास सरोदे सरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्य व लेखन कौशल्य गुणांच्या वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री.विजयनारायण पंडित यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले व त्यांना संस्काररूपी गोष्ट सांगितली. सेवानिवृत्तीनंतर फारसं कुणी आपल्या कामाच्या ठिकाणी फिरकायला मागत नाहीत, परंतु श्री. कैलास सरोदे सर हे सेवानिवृत्तीनंतरही शाळेत येतात व विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवितात म्हणून त्यांचं भरभरून कौतुक केलं.तसेच श्री.रमेश गोरे यांच्याही सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले.यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.रमेश गोरे सरांनी विजयनारायण पंडित यांच्या सामाजिक कार्याबद्दल व उदारपणाबद्दल मनमोकळेपणाने भरभरून उल्लेख केला.शाळेतर्फे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विजयनाराण पंडित व अध्यक्ष म्हणून श्री रमेश गोरे सरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप सलाबत तडवी, श्री. पी.एस. बाविस्कर ज्येष्ठ शिक्षक श्री. उत्तम गायकवाड सर, सौ. मनीषा जाधव, श्री.कैलास सरोदे सर कलाशिक्षक श्री. पांडुरंग भारतीसर , श्री. देवेंद्र कापसे सर, कुमारी मृणालिनी ठाकूर मॅडम श्री. उगले सर यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, बदलापूर शाळेच्या आर्टिस्ट व कला शिक्षिका सौ. उर्मिला दूरगुडे मॅडम, शाळेचा माजी विद्यार्थी व आर्टिस्ट कुमार यशवंत गगे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक करून दाविल्याबद्दल व शाळेच्या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.तसेच शिल्पकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मूर्तिकार श्री. सचिन गोडांबे व फातिमा हायस्कूल, अंबरनाथचे कलाशिक्षक,कवी, व्याख्याते व समाजसेवक श्री. संदीप ईश्वर पाटील सर यांनी निसर्गचित्रण स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहकार्य केल्याबद्दल यांचाही सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या बक्षीस समारंभाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन शाळेतील सौ. मनीषा जाधव यांनी उत्कृष्ट असे केले. या उपक्रमांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बालक मंदिर संस्था, पदाधिकारी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षक व पालक यांच्याकडून भरभरून कौतुक करण्यात आलं.
.jpg)

Post a Comment
0 Comments