डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम रनचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ही स्पर्धा डॉ. यू. प्रभाकर राव, मिलाप नगर, डोंबिवली पूर्व या मैदानात सिंथेटिक ट्रॅकवर पार पडली. स्पर्धेचा शुभारंभ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या स्पर्धेत चारशेहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित धावपटू या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त स्पर्धक सलग १२ तास धावले तर १५० पेक्षा जास्त स्पर्धक सलग ६ तास आणि १५० पेक्षा जास्त स्पर्धक २ तास रिले रनमध्ये धावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत १५ महिला नऊवारी साडीमध्ये अस्सल मराठी पोशाखात धावल्या ज्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचा गौरव झाला. ही स्पर्धा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा असून रनर्स क्लॅन फाऊंडेशन या संस्थेने मोठ्या जबाबदारीने पार पाडली.
"एक दौड वीर जवानों के लिए" या थीमअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली ह्या ६५ किमी अर्बन अल्ट्रा मॅरेथॉनच्या गेल्या पाच वर्षांच्या अभूतपूर्व यशानंतर रनर्स क्लॅन फाऊंडेशन या संस्थेने प्रथमच १२ तास स्टेडियम रनचे धनुष्य हाती घेतले आणि ते यशस्वीपणे पेलवून दाखवले.
संस्थेने विजेता स्पर्धकांना स्थानिक आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रोत्साहन बक्षिसांचे वितरण केले.
१२ तास सोलो रनमध्ये प्रथम पारितोषिक विशाल वळवी, महिलांमध्ये सुजाता शाहू, ६ तास सोलो रनमध्ये रामदास मेस्त्री, सोलो महिला मध्ये राणी सिंग आणि
रिले मध्ये केडीआरची टीम अव्वल ठरली. शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष गिरीश लोखंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
.jpg)



Post a Comment
0 Comments