ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन सार्वभौम, लोकशाही प्रधान आहे. या प्रसंगी आपण आपली भाषा स्वतंत्र ठेवली आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे कारण संविधान आपल्याला अधिकार देतो तर भाषा आपल्याला ओळख देते. मराठी भाषा ही इतिहासाची भाषा आहे. अभंग, पोवाडे, लोकगीते, भारुडे यातून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. परंतु सांस्कृतिक घसरण होऊ नये म्हणून मराठीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी भाषेचा सक्रीय वापर, निर्मिती, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिजात मराठी हस्तांतरित करा असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून कोकण ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांनी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक वाचनालय कल्याण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी केले. 
देशाचे सज्ञान, सुजाण, आदर्श नागरिक होण्याकरिता मराठी भाषेशी समरस व्हा, आपली भाषा वापरातून जिवंत ठेवा. असा मोलाचा सल्ला वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थी चालवितात वाचनालय, पुस्तक रसग्रहण स्पर्धा २०२६, माझे कल्याण शहर – प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६ अशा विविध स्पर्धातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये बिर्ला महाविद्यालय कल्याण, प्रगती महाविद्यालय, डोंबिवली, अॅचिव्हर्स महाविद्यालय,कल्याण, सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगर अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग नोंदविला होता. विजयी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा रुईता सपकाळ यांनी प्रमुख पाहुण्या म्हणुन वाचनालयाच्या सर्व उपक्रमाला व पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन २१ हजारांची देणगी देणार असल्याचे जाहीर केले. प्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस नीलिमा नरेगलकर, कार्यकारणी सदस्या अमिता कुकडे, कार्यकारीणी सदस्य अरुण देशपांडे, वाचक वर्ग, शिक्षक गण, विद्यार्थी वर्ग व वाचनालयाच्या ग्रंथसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
.jpg)

Post a Comment
0 Comments