ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना कल्याण-डोंबिवलीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २२ मधील युतीचे उमेदवार अश्विनी अनमोल म्हात्रे आणि इतरांच्या प्रचारासाठी गोपीनाथ चौकात युतीतर्फे विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती.महायुतीचे उमेदवार प्रकाश भोईर, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि अश्विनी म्हात्रे यांच्या प्रचारासाठी देवी चौकात ही सभा घेण्यात आली होती.यावेळी भाजपचे राहुल दामले, जितेंद्र भोईर, शरद गंभीरराव, प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष नंदू परब हे ही उपस्थित होते.
रविवारी डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौकातील युतीच्या उमेदवारांच्या विजयी संकल्प सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली पूर्वेतील मनसेचे अभ्यासू, उच्चशिक्षित माजी नगरसेवक, शहराध्यक्ष ॲड. मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.याच वेळी मनोज घरत यांच्यासह रवी गरुड, केदार चाचे, संदीप शिंदे, संतोष शिलकर, निनाद मिसाळ यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
"मी जे काही केले ते माझ्या सहकाऱ्यांच्या संमतीने केले आहे. राज साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्याबद्दल मनात चांगल्याच आठवणी राहतील. आता भाजपमध्ये जे काही पद मिळेल, त्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करू,” असे मनोज घरत यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण सूचक वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी म्हटले की, “बरेच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही, आमचे सर्व मित्र हळूहळू एकत्र यायला सुरुवात झाली आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “मोठा मित्र सुद्धा लवकरच भाजपमध्ये येईल, याची मला खात्री आहे. कधी यायचं हे फक्त वेळ आणि काळ शोधतोय. कधी ना कधीतरी एक दिवस तो मित्र नक्कीच येईल.”
असे विधान चव्हाण यांनी केले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विकास म्हात्रे यांना संबोधून "विकासजी बरोबर ना" असे म्हणत विचारणा केली यामुळे हे विधान नक्की मनसेच्या मित्राला होते की शिवसेना शिंदे गटातील मित्र पक्षाला होते अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कल्याण डोंबिवलीतील राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या काळात भाजपात आणखी कोणते मोठे चेहरे प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
.jpg)



Post a Comment
0 Comments